
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलूर हुन नांदेड ला जाणाऱ्या ऑर्डीनरी बस मध्ये प्रवासी घेण्यास दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी देगलूर आगारातील वाहक एस. एम. मुंडकर यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली; त्यामुळे खानापूर फाट्यावरून वन्नाळी, वझरगा,शंकरनगर, किनाळा, घुंगराळा, मारतळा आदी गावांना जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
देगलूर आगाराचे गणित केल्या कांही महिन्यापासून पार बिघडून गेले आहे. अशोक चव्हाण यांची कंधार आगारात बदली झाल्यापासून येथील आगार प्रमुख म्हणून चार महिन्यात चार जणांनी कार्यभार पार पाडला. सध्या असलेले आगर प्रमुख हे नवखे आणि शांत स्वभावाचे आहेत. त्यांना येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि कार्यपद्धती माहीत नसल्यामुळे ते कठोर पावले उचलत नाहीत. त्यांच्या स्वभावामुळे आगारातील कांही वाहक- चालकांनी मनमानी कारभार सुरू केला आहे. प्रवाशांचा अपमान करणे, योग्य त्या ठिकाणी गाडी उभी न करणे, नांदेडहून देगलूरला आल्यावर जुन्या बसस्थानकात गाडी आणण्याऐवजी नवीन बस स्थानकात गाडी उभी करून ‘गाडी येथेच थांबणार आहे. जुन्या बस स्थानकापर्यंत जाणार नाही’ म्हणून विनाकारण प्रवाशांच्या माथी ऑटो भाडे मारणे, ‘तिकीट मशीन डिस्चार्ज झाली तिकीट काढता येत नाही’ म्हणून नांदेडहून प्रवासी न घेता सरळ देगलूरला येणे. असे प्रकार सातत्याने घडत असतात. आता तर येथील कर्मचाऱ्यांची मजल आणखीही पुढे गेली आहे. वास्तविक पाहता कोरोना काळातील बंद बससेवा, त्या नंतरचा तब्बल सहा महिन्यांचे काम बंद आंदोलन, अनेक दिवस बंद असल्यामुळे भंगारावस्थेकडे झुकलेल्या बसगाड्या यामुळे अगोदरच खालावलेली परिवहन महामंडळाची आर्थिक घडी जवळपास विस्कटत आली आहे. त्यातच कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा, मुद्दामपणा यामुळे देगलूर आगाराची नाचक्की होत आहे. दि. 26 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी देगलूर आगाराची बस (क्रमांक एम एच 20 बी एल 2454) नांदेडला मार्गस्थ झाली. सदर गाडी खानापूर फाट्यावर गेली असता तेथे उभे असलेले जवळपास 18- 20 प्रवासी बस थांबविण्याची विनंती करीत होते. प्रवाशांची विनंती ऐकून चालकांनी बस थांबविली; परंतु ‘गाडीत जागा नाही, मागून औरंगाबाद गाडी येत आहे’ असे सांगून वाहक एसएम मुंडकर यांनी गाडी पुढे नेण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर वन्नाळी बस स्थानकावर गाडी न थांबविता पुढे आमोदी नर्सरी जवळ बस उभी करून बसमधील एका महिला प्रवेशाला खाली उतरविले.बसमधील कांही प्रवाशांनी ‘खानापूर फाट्यावरील प्रवासी का घेतले नाहीत’ म्हणून विचारले असता वेगवेगळे बहाणे करून वाहक मुंडकर यांनी खरे उत्तर देण्याचे टाळले. खानापूर फाट्यावर थांबलेल्या प्रवाशांपैकी काहीजण बिजूर, शंकरनगर, किनाळा, घुंगराळा, देगाव आदी ठिकाणी जाणारे होते. त्यांना जर आर्डिनरी गाडीमध्ये जागा मिळाली असती तर त्यांचा वेळेत प्रवास झाला असता. त्यानंतर येणारी औरंगाबाद असो किंवा नागपूर असो ह्या गाड्या छोट्या स्थानकावर थांबत नसल्यामुळे या प्रवाशांना जवळपास अर्धा ते पाऊण तास खानापूर फाट्यावर ताटकळत थांबावे लागले.देगलूर आगारातील वाहक- चालकांचे वर्तन असेच राहिले तर या आगाराला लवकरच वाईट दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रवाशांमधून बोलले जात होते.