
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, श्री शिवाजी मोफत एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष भाई डाॅ. केशवराव धोंडगे यांचा आणि माझा ३०-३२ वर्षांचा ऋणानुबंध राहिला आहे. गुराखी गडावर आयोजित संमेलनाला भाई धोंडगे साहेब मला आवर्जून निमंत्रित करायचे. माझे सर्पदंश जनजागरणाचे अनेक कार्यक्रम त्यांनी तिथे घडवून आणले. स्वतः धोंडगे साहेबांनाच एकदा सर्पदंश झालेला. त्यामुळे विंचू-किड्यात वावरणार्या शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या वेदनेप्रतिची संवेदना त्यांनी आयुष्यभर जोपासली.
भाई केशवराव धोंडगे म्हणजे निर्भीड, रोखठोक, लढवय्या नेता. त्यांनी कर्मकांडावर आयुष्यभर प्रहार केले. समाजहिताची अनेक आंदोलने उभी करून ती यशस्वीही केली. मन्याड खोर्यात वावरणार्या या नेत्याची कित्येक भाषणे संसद व विधी मंडळात गाजलेली. त्यांची नोंद सरकार दरबारी दफ्तरात आहे. डोंगराळ-दुर्गम भागात शिक्षणाचे फार मोठे जाळे उभे करून हजारो गोर-गरिबांच्या मुलांना सुशिक्षित करून नोकरीची संधीही त्यांच्यामार्फत निर्माण झाली. ‘जय क्रांती’ या नियतकालिकातून समाज जागृती, समाजातील अनास्था, चुकीच्या रुढी-परंपरा यावर केलेले प्रहार हे सदैव समाज प्रबोधनाचे द्योतक राहिले आहे. शोषिता, वंचितांचा कैवार घेणारे भाई केशवराव धोंडगे म्हणजे Voice of Voiceless.भाई धोंडगे प्रदीर्घ काळ आमदार व काही काळ खासदार राहिले. ते फर्डे वक्ते होते. त्यांचे राजकीय जीवन तर बहारलेलेच. बहाद्दरपुरा कंधारच्या या सुपुत्राच्या भाषणाची सुरुवातच ‘मन्याड खोर्यातील बहाद्दरांनो !’ या वाक्याने जनतेच्या हृदयाचा ठाव घ्यायची. त्यांच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक नेतृत्वाने मन्याड खोर्यातले लोकजीवन व्यापून राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने भाईंच्या कार्याची नोंद घेत विधीमंडळात त्यांचा गौरव केला.
नियंत्रित आहार, नियमित व्यायाम व इतरांच्या सुख-दुःखातील सहभाग (Share & Care) हेच भाईंच्या शतायुषी जगण्याचं गमक आहे.
भाई धोंडगे साहेब ज्या ज्या वेळी मुखेडला येत त्या त्या वेळी ते मला आवर्जून भेटायचे. आस्थेवाईकपणे चौकशी करायचे. त्यामुळे आमच्यात कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झालेला. ते आमच्या सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी आवर्जून उपस्थित राहात असत. त्यांचे माझ्यावर पुत्रवत प्रेम होते. भाई धोंडगे साहेबांचे जाणे म्हणजे बहरलेल्या कृतार्थ जीवनाचा अंत. मृत्यू हेच जीवनाचे अंतिम सत्य. ‘भाईंचे श्वासाचे आयुष्य संपले असले तरी ध्यासाचे आयुष्य चिरकाल राहील.’
आजच्या अस्थिर राजकीय परिस्थितीत भाईंनी जोपासलेली राजकीय एकनिष्ठा जन माणसाच्या कायम स्मरणात राहील.
‘देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातुनी सुद्धा
स्वस्ति पद्मे रेखिती’
या बा.भ.बोरकरांच्या काव्यपंक्तिप्रमाणे भाईंच्या पाऊलखुणा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहातील. चालता फिरता अनेकांना सुगंध देणार्या अत्तराचा आता शोध कुठे घ्यावा ?
भाईंच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्यच.
‘दाटून दुःखे हळहळतो जनसागर सारा
मन्याडतीरी मावळला एक धगधगता तारा’ असा हा प्रसंग…
हे दुःख पेलण्यासाठी विधाता त्यांचे कुटूंबीय व समाजास आत्मबल देवो. हीच प्रार्थना…
भाईंस साश्रू नयनांनी भाववपूर्ण श्रद्धांजली…
ॐ शांती …शांती … शांती
🙏🏻💐💐💐