दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
कुठे गेली गुड मॉर्निंग पथके? साथीच्या आजारांना आमंत्रण! तालुक्यातील गावे हागणदारी मुक्त झाली याबाबतची कोणतीही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही.
भूम:-केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवते. या योजनांवर कोट्यावधींचा निधी खर्च होतो. अशीच स्वच्छतेची ‘हागणदारी मुक्त गाव’ योजना शासनाने राबवली होती. यामध्ये तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग देखील घेतला होता. मात्र आजही तालुक्यातील गावे हागणदारी मुक्त झाली, याबाबतची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही.
तालुक्यातील अनेक गावामध्ये हागणदारी मुक्तीचे फलक लावण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर अनेक गावांना हागणदारी मुक्तीचे पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आले होते. परंतु सध्या वास्तव वेगळेच पहायला मिळतं आहे. फलक फक्त नावालाच उरले आणि गावातील नागरिकांच्या हाती टमरेल दिसत आहे. खेड्यांत जवळपास प्रत्येक गावात प्रवेश करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. बऱ्याच ग्रामपंचायतींनी गावात हागणदारी मुक्तीचे फलक लावले आहे. मात्र फलकावरील योजना या फलकावरच राहिल्या आहेत. अनेक गावांतील शाळा गावबाह्य असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना दुर्गंधीग्रस्त रस्त्याने प्रवास करावा लागतो.
केंद्र व राज्य सरकारने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागांत स्वच्छतेच्या बाबतीत भर दिला आहे. यासाठी ग्रामपंचायत व नगरपंचायत कामाला लागली आहे. मात्र, या योजनेअंतर्गत ग्रामीण भागांत अनेकांना शौचालये बांधून दिल्यानंतरही त्यांची शौचास बाहेर जाण्याची सवय सुटल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागात या महत्त्वाच्या अभियानाचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे.अनेक कुटुंबांतील व्यक्ती शौचालयाचा वापर कमी व मोबाइल फोनचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसून येत आहेत.
कुठे गेली गुड मॉर्निंग पथके?
हागणदारीमुक्त गाव तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत असताना अनेक नगरपालिका, नगरपंचायतींनी गुड मॉर्निंग पथके तयार केली होती. या पथकातील अधिकारी, कर्मचारी सकाळी नागरिक उघड्यावर शौचास बसतात अशा ठिकाणी जाऊन गांधीगिरी मार्गाने त्यांना फूल द्यायचे किंवा ढोल, ताशे वाजवून लोट्यासह हार घालून त्यांचा सत्कार करायचे. काही ठिकाणी पोलिसांची मदत घेऊन उघड्यावर बसणाऱ्यांचे लोटे जप्त करून आर्थिक दंडही ठोठावण्यात आला होता.
साथीच्या आजारांना आमंत्रण! बहुतांश गावात आजाराने थैमान घातले आहे. उघड्यावर शौचास जाणे हे अद्यापही बऱ्याच ठिकाणी सुरुच आहे. यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाणीने बरबटलेले रस्ते आरोग्यास धोकादायक ठरू शकते. घरी शौचालय आहे, परंतु त्याचा नियमित वापर, शौचालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे. गाव परिसरातील नदी-नाल्यांचे पाणी दूषित झाल्यास मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात,.याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणे नियमितपणे निर्जंतुकीकरण करून, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.


