दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
पुणे : ‘टिल्ल्या’ लोकांनी मला सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ. माझे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील. असल्या लोकांच्या नादी लागत नसतो’, असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यावर काहीदिवसांपूर्वी निशाणा साधला होता.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी नितेश राणे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘दीड फुटाचा आमदार तीन फुटांची जीभ असल्यासारखा बोलतो’, अशा खोचक शब्दांत विद्या चव्हाण यांनी रोष व्यक्त केला आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या की, ‘आधी महागाई कमी करा मग बोला. दीड फुटाच्या आमदाराची जीभ तीन फुटांची झाली आहे. तो इतकं बोलतो की अजित पवार यांच्यावर टीका करतो. पवारांवर टीका करण्याआधी तुम्ही ज्या मतदारसंघात आहात तेथील लोकांचे प्रश्न मांडा ना. महागाईची समस्या तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना नाही का?’
‘लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचं. कधी भगवा आणायचा तर कधी अजून काही आणायचं. आम्हीपण हिंदू आहोत, आम्हीसुद्धा पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर निघत नाही’. भगवं वस्त्र हे त्यागाचं प्रतिक आहे. मात्र तेच भगवं वस्त्र धारण करायचं, भलंमोठं कुंकू लावायचं, गुंडगिरी करायची आणि त्या गुंडगिरीला साधुसंत म्हणयाचं, एवढे आम्ही मुर्ख नाही’. अशी टीका त्यांनी केली.
‘आम्ही संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम यांच्यापर्यंत संत परंपरा काय आहे ते बघितलं आहे. काल आम्ही देहूला होतो. तिथे आम्ही संत तुकाराम महाराजांना नमस्कार केला’, असं विद्या चव्हाण म्हणाल्या.


