
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर: आमच्या गावात ट्रॅक्टर घेऊन यायचा नाही व धंदा करायचा नाही या किरकोळ कारणावरून शेटफळ हवेली येथील युवक जीवन ज्ञानदेव जाधव यास मारहाण करण्यात आली.हि घटना शुक्रवार (दि.२६) निरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या ठिकाणी सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेटफळ हवेली येथील युवक जीवन ज्ञानदेव जाधव व्यवसाय शेती व या बरोबर स्वतःच्या ट्रॅक्टरने दुसऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन मशागत करण्यासाठी भाडे घेतो. शेटफळ हवेली बरोबरच आजूबाजूच्या परिसरामध्ये तो आपला ट्रॅक्टर घेऊन भाडे करण्यासाठी जात असतो. हाच व्यवसाय तो रेडा या गावी पण करत होता परंतु गेल्या पंधरा दिवसांपूर्वी रेडा येथील गौरव दत्तात्रय देवकर यांनी त्याच्या मोबाईल वरून जीवन जाधव यास फोन करून तु आमच्या गावात ट्रॅक्टर घेऊन येत जाऊ नकोस व आमच्या गावात धंदा करायचा नाही असे म्हणून दमदाटी केली होती.
त्यानंतर आज गुरुवार दिनांक 26 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास जीवन जाधव हा भोडणी गावच्या हद्दीतील घाडगेवस्ती येथे असताना गौरव देवकर यांनी जीवन जाधव यास फोन करून आमच्या गावात ट्रॅक्टरचा व्यवसाय करायचा नाही नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली त्यानंतर लगेचच रोहित उर्फ नन्या दत्तात्रय देवकर यांनीही जीवन यास फोन करून करून तुला आमचा हिसका दाखिवतो तु आमच्या गावात ट्रॅक्टरचा व्यवसाय का करतो असे म्हणून मला निरा भीमा कारखान्याकडे ये,नाही आला तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. या आरोपींची दहशत आसपासच्या गावात असल्याने जीवन जाधव हा भयभीत होऊन निरा भिमा कारखान्याकडे आपण गेलो नाही तर मला खरोखरच ते मारतील या भीतीपोटी तो निरा भीमा कारखान्या जवळील सुरज पान शॉप जवळ ट्रॅक्टर घेऊन गेला असता या ठिकाणी काही वेळातच तीन मोटरसायकल वरून गौरव दत्तात्रय देवकर, रोहित दत्तात्रय देवकर, अक्षय सुरेश देवकर रहाणार सर्वजण रेडा व त्यांच्यासोबत इतर सहा अनोळखी युवक जीवन जाधव जवळ आले यावेळी त्यांच्या हातात तलवार, सतुर, लोखंडी रोड, चैन ,पाईप ही हत्यारे होती. यावेळी त्यांनी जीवन जाधव यास शिवीगाळ व दमदाटी करू लागले आणि आज आम्ही तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून गौरव देवकर यांनी त्याच्या हातातील तलवारीने जीवन जाधव यांच्या डाव्या हातावरती वार केला, लगेचच रोहित देवकर यांनी त्याच्या हातातील तलवारीने ठार मारण्याच्या उद्देशाने जीवन च्या डाव्या कानावरती वार करून गंभीर दुखापत केली तसेच अक्षय देवकर यानी त्याच्या हातातील लोखंडी सतुराने पायावरती वार करून गंभीर दुखापत केली आणि यावेळी या झालेल्या दुखापतीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तस्राव होऊ लागल्याने जीवन जाधव हा मला सोडा मला मारू नका अशी विनवणी करू लागला परंतु अनोळखी इसमापैकी एकाने हातातील लोखंडी चैनने त्याच्या पाठीवर, कमरेवर आणि हातावर मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी गौरव देवकर यांनी दुसऱ्या अनोळखी इसमापैकी एकाला सांगितले की याला संपवून टाका, त्यावेळी अनोळखी त्यांच्या हातात असलेल्या लोखंडी रोड डोक्यामध्ये जोरदार मारहाण करून गंभीर दुखापत केली यावेळी जीवन जोर जोरात मला वाचवा मला वाचवा असे ओरडू लागला परंतु त्याला मारहाण करणारे यांची दहशत असल्याने सोडवण्यासाठी कोणी समोर आले नाही. यावेळी या सर्व आरोपींनी त्यांच्या हातात असणारी हत्यारे पाहून व त्यांच्या दहशतीला घाबरून कारखाना चौकातील काही दुकानदार यांनी आपली दुकाने बंद करून ते पण निघून गेले तसेच या चौकामध्ये उभा असणारे लोकही यांच्या दहशतीला घाबरून निघून गेले त्यानंतर हे सर्व आरोपी जीवन कडे पाहून चौकामध्ये मोठ मोठ्याने ओरडून सांगत होते जर याला कोणी दवाखान्यात नेले तर आम्ही त्याच्याकडेही बघून घेऊ असे म्हणत ते सदर ठिकाणाहून तीन मोटरसायकलवर बसून निघून गेले हे सर्वजण निघून गेल्यानंतर सुरज बाळासाहेब घाडगे, योगेश हरिदास पवळ, रोहित जनार्दन जाधव, रेवन साधू गोसावी हे त्या ठिकाणी आले आणि जीवन जाधव यास खाजगी वाहनाने इंदापूर येथील सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केले.
जीवन ज्ञानदेव जाधव (वय३३) यांनी या प्रकरणी गौरव दत्तात्रय देवकर, रोहित दत्तात्रय देवकर, अक्षय सुरेश देवकर सर्व रा,रेडा व इतर ६ अनोळखी व्यक्तींच्या विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
सदर घटनेनंतर शेटफळ हवेली,भोडणी, शहाजीनगर व आजूबाजूच्या परिसरातील युवकांनी आणि नागरिकांनी निरा भिमा कारखाना, इंदापूर पोलीस स्टेशन आणि इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली होती.
यावेळी शेटफळ हवेली गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी डीवायएसपी गणेश इंगळे व इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याशी चर्चा करून सदरील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून या सर्व आरोपींची पाठीमागील गुन्ह्यांची माहिती घेऊन या आरोपींना लवकरात लवकर अटक करून यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन डिवायएसपी गणेश इंगळे यांनी तातडीने वरील ठिकाणी भेट देऊन जमवला शांत राहण्याचे आव्हान केले. आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावरती योग्य ती कठोर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे. सदर घटनेतील एका आरोपीस रात्री उशिरा अटक करण्यात आले आहे.