
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी जव्हार-दिपक काकरा.
पालघर/जव्हार: जव्हार शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐतिहासिक स्थळ शिरपामाळ नजीक अंध व मतिमंद मुलांच्या निवासी दिव्य विद्यालय शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी हजेरी लावली.या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करतांना शाळेतील अंध व मतिमंद मुलांनी झेंडा पथकाच्या व ढोल तास्यांच्या गजरात स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली.या सांस्कृतिक कार्यक्रमात कोळी गीत,शेतकरी गीत,देशभक्तीपर गीते,फॅन्सी ड्रेस,गायन व वादन यासारख्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.या वेळी प्रत्येक वर्गातील गुणवंत व आदर्श विद्यार्थी,आदर्श शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुणगौरव करण्यात आला.शिवाय शाळेतील पालकांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना तिळगुळ व साड्याही वाटप करण्यात आल्या.
यावेळी बोलतांना आमदार भुसारा यांनी अंध व मतिमंद विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शाळेला मी माझ्या परीने जरूर मदत करेन असे आश्वासन देऊन त्यांनी साधारण विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला अनेक मोठ्या बाबुची रीघ लागलेली असते परंतु अशा विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला व गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी अनेकांना वेळही नसतो.आज मी या ठिकाणी आल्यानंतर या विद्यार्थ्यांनी जी कला सादर केली ती वाखण्य जोगी असून मी या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना घडविणाऱ्या सर्व शिक्षक पालक व संस्थाचालकांचे कौतुक करतो असे गौरोउद्गार या वेळी त्यांनी काढले.या प्रसंगी जव्हार नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रियाज मणियार,ठाकूर गुरुजी,दत्तक पालक,शाळा संस्थापिका प्रमिलाताई कोकड,जव्हार मधील प्रतिष्ठित व्यक्ती व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.