
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
वसमत – माणसाने जीवन जगताना सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे आहे. आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना विश्वासाने सामोरे गेले पाहिजे. समाजाच्या सेवेतून आनंद मिळतो आणि समाजाची सेवा करण्याची प्रेरणा राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून मिळत असते, असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री तथा संस्थाध्यक्ष डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी केले. ते रासेयो शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मौजे रुंज ता. वसमत येथे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थासचिव डॉ. गोविंदराव इपकलवार हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अशोक पडोळे, डॉ.दयाराम मस्के, सरपंच सुदामराव फुलझळके, चंद्रकांत फुलझळके, पंडितराव फुलझळके,पोलीस पाटील सोनाजीराव माखणे, विनायकराव माखणे, मुख्याध्यापक श्री.भांडेगावकर सर, श्री. राजेश मंचेवार, प्राचार्य डॉ नागनाथ पाटील हे होते .
यावेळी पुढे बोलताना डॉ. मुंदडा म्हणाले की, हा काळ स्पर्धेचा असून अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास, परिश्रम करणे गरजेचे आहे. शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. तसेच विद्यार्थी व गावकऱ्यांच्या समन्वयातून विकास साधला जातो, असेही त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले की, ज्ञान आणि विज्ञान जगण्यासाठी महत्त्वाचे आहे.तसेच शिक्षणाचे सामर्थ्य प्रचंड आहे त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाची कास धरणे आवश्यक आहे .या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. गोविंदराव इपकलवार यांच्या भाषणाने झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. किशन बाभुळगावकर यांनी केले. अहवालवाचन कार्यक्रमाधिकारी प्रा. सुभाष ठोके यांनी केले. स्वागतगीत मयुरी खाडे यांनी गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ. संजय गायकवाड यांनी मानले.यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सर्व प्राध्यापक व शिबिरार्थींचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमास प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.