
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
सध्या औरंगाबाद ते पुणे यातील प्रवासाचे अंतर हे 5 तासांहून जास्त आहे. मात्र, मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वे पुढील वर्षी पूर्ण झाल्यानंतर लवकरच औरंगाबाद ते पुणे प्रवास फक्त दोन तास पूर्ण करता येणार आहे, असे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील 2300 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद ते पुणे दरम्यान सुमारे 225 किमी अंतराचा हा प्रवेश-नियंत्रित एक्स्प्रेस वे बांधला जाणार आहे. यासाठी 100 अब्ज रुपये खर्च येणार आहे. तर औरंगाबाद-पुणे ग्रीन एक्स्प्रेस वे पुण्याला 701 किमी लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाशी जोडेल.
गडकरी म्हणाले की, द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच सुरू होईल, आणि महाराष्ट्रात सहा महामार्ग बांधले जात आहेत त्यामुळे इतर शहरांना जोडणारा पुणे आणि नागपूर दरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सातारा जिल्ह्यातील फलटण येथे लोकांना संबोधित करत होते.