
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक -मोहन आखाडे
मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या चिंतेचा विषय बनला आहे. तर आता याच शेतकरी आत्महत्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. गेल्या आठवड्याभरात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे यातील तीन शेतकरी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. सुरज उदयसिंग सेवगन ( वय 25 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सूरज सेवगन यांची पळसखेडा शिवारात पाच एकर शेती आहे. शेती करण्यासाठी त्याने बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र सतत नापीकीला सामोरे जावे लागत असल्याने हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून सेवगन याने विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपवले असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी फर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात आठवड्याभरात सहा शेतकऱ्यांची आत्महत्या!
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. त्यानंतर गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशोक भिका शिरसाट असे या मयत शेतकऱ्याचं नाव आहे. त्यानंतर कर्जबाजारीपणास कंटाळून खुलताबाद तालुक्यातील दरेगाव आणि वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली होती. शंकर अंबादास गायकवाड (वय 35 वर्षे) आणि राजूसिंग लालसिंग बेडवाळ (वय 40 वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत. असे असताना आता सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सुरज उदयसिंग सेवगन ( वय 25 वर्षे) या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
चक्क कृषीमंत्र्यांचाच तालुका नुकसानीतून वगळला
एकीकडे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात शेतकरी आत्महत्या होताना पाहायला मिळत असताना, दुसरीकडे सत्तार यांच्या सोयगाव तालुक्याला नुकसानीतून वगळण्यात आले आहे. सोयगाव तालुक्यात शून्य टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे. या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना देखील, नुकसान झालाच नसल्याचा अहवाल पाठवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप पाहायला मिळत आहे.