
जरांगेंनी दंड थोपटले !
भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर घेतलेल्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य करीत नवीन वाद ओढवून घेतला.
दसरा मेळाव्यात त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? असा थेट सवाल करीत मनोज जरांगे यांना अप्रत्यक्षपणे डिवचण्याचा प्रयत्न केला. मनोज जरांगे यांना मुंडे यांच्या विधानाचा आज समाचार घेतला. ते माध्यमांशी बोलत होते.
धनंजय मुंडेंच्या विधानावर मनोज जरांगे संतापले. “तुम्ही बंजारा समाजातून आरक्षण का घेतलं? बरं झालं आता बीड जिल्ह्यातील मराठे शहाणे होतील. ते (धनंजय मुंडे) मला बोलत असले तरी मला काही होणार नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका, मला तुम्ही (पत्रकार) त्यांच्याबाबत (मुंडे बहीण-भाऊ) प्रश्नही विचारू नका. आता एकदाच सांगतो, माझ्या नादी लागू नको. शहाणपणा करायचा नाही. मी दादांना (अजित पवार) वैगेरे मोजत नसतो. रक्तांनी हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही,” असे सांगत जरांगे यांनी मुंडेंवर पलटवार केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोण-कोण मराठे तिकडून उभे राहणार हे आम्ही पाहणार आहोत. धनंजय मुंडे ज्यांच्या-ज्यांच्या प्रचाराला येणार, त्या उमेदवाराला आम्ही निवडणुकीत पाडणार, उमेदवार मराठ्यांचा असला तरीही त्याला पाडणार,” असा इशारा जरांगे यांनी दिला. “आमच्या लेकरांना आरक्षण द्यायला हे विरोध करीत आहेत, त्यांना थोडफार काही वाटलं पाहिजे,” असा शब्दात जरांगे यांनी मुंडेंवर आगपाखड केली.
“मी जातील कट्टर मानणारा व्यक्ती आहे, तुम्ही काहीच नाहीत. मी ऐकून घेतोय तर शहाणपणा करायचा नाही, मी आता हे क्लिअर सांगतो माझ्या नादी लागला तर मी तुमच्या दोघांचाही (पंकजा मुंडे,धनंजय मुंडे) बाजार उठवणार, तुमच्यामुळे (धनंजय मुंडे) मी अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन,” अशा शब्दात जरांगे यांनी तोफ डागली.
मनोज जरांगे काय म्हणाले….
तुमच्या दोघांनाही मी सांगतो, तुम्ही शहाणे असाल तर तुमच्या दोघांच्याही हातून आणखी वेळ गेलेली नाही. तुम्ही माझ्या आणि माझ्या जातीच्या नादी लागू नका. तुम्ही छगन भुजबळ यांचं ऐकून माझ्या नादी लागू नका. अन्यथा तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या आणि माझ्या नादी लागू नका, खूप बेक्कार होईल, राजकारणातील तुमचं नामोनिशाण मिटून जाईल.