
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
राजुरा तालुक्यातील चुनाळा सेवा सहकारी संस्था संचालक मंडळाच्या तेरा संचालक पदासाठी (दि. २६) झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पार्टी समर्थित शेतकरी विकास पॅनलचे तेरा उमेदवार निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत काँग्रेस प्रणित विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसून सेवा सहकारी संस्थेवर आपला झेंडा रोवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र मागील अनेक वर्षापासून माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वाखाली ही सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या हिताचे काम करीत असल्यामुळे येथिल शेतकरी मतदारांनी शेतकरी विकास पॅनलला भरघोस पाठींबा देत या संस्थेचा गेल्या अनेक वर्षापासूनचा रेकॉर्ड कायम ठेवत तेरा पैकी तेरा ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी करीत विरोधकांना या संस्थेवर नो इन्ट्री चा संदेश दिला. मागील वर्षी झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत सुद्धा येथील मतदारांनी तेरा पैकी तेरा सदस्य विजयी केले होते. पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती या निवडणुकीच्या निमित्याने दिसून आली.
पाच वर्षांसाठी तेरा संचालकांसाठी घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या निवडणूकीचा निकाल मतदाना लगेच मतमोजणी करून जाहीर करण्यात आला. या संस्थेमध्ये चुनाळा, बामनवाडा व नवी सातरी या ग्रा. पं. क्षेत्रातील एकूण २७८ शेतकरी मतदारांचा समावेश आहे. यापैकी ९२.२ टक्के (२५६) मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. या सेवा सहकारी संस्थेत शेतकरी विकास पॅनलकडून सर्वसाधारण गटामधून प्रकाश आस्वले (१३१ मते), बाबुराव निखाडे (१२५), बापुजी निमकर (१३९), मनोहर निमकर (१३९). संजय पावडे (१३८), कृष्णा पोटे (१४१), किशोर रागीट (१३६), योगेश वडस्कर (१३७), अनुसूचित जाती जमाती गटातून शामराव मानकर (१३८), ओबीसी गटातन प्रभाकर साळवे (१४९), विजेएनटी गटातून लटारी मोंढे (१५७), महीला राखीव गटातून अरुणा डाहूले (१४४), अनिता मासिरकर (१४९) भरघोस मतांनी विजयी झाले.
मागील अनेक वर्षांपासून या सेवा सहकारी संस्थेवर माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. अनेकदा विरोधकांनी येथिल सत्ता परीवर्तन करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावून परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. परंतु येथिल शेतकरी मतदारांनी माजी आमदार निमकरांचे नेतृत्व स्विकारीत भाजपा समर्थित शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना मतरुपी आशीर्वाद दिला. ही निवडणूक भाजपा समर्थित शेतकरी विकास पॅनल विरुद्ध काँग्रेस समर्थित ग्राम विकास परिवर्तन पॅनलने शेतकरी संघटनेच्या काही तगड्या उमेदवारांना सोबत घेऊन लढविल्यामुळे अतिशय चुरशीची झाली होती. परंतु चुनाळाचे सरपंच बाळनाथ वडस्कर आणि संस्थेचे अध्यक्ष तथा माजी सरपंच संजय पावडे यांनी या निवडणुकीत शिस्तबद्ध व्युवरचना आखून विरोधकांना चित केले.
या निवडणुकीत विजयी झालेल्या संचालकांना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सुरू झालेल्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळणार असल्यामुळे या निवडणुकीकडे तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र शेतकरी मतदारांनी विकासाची दृष्टी असलेले व या क्षेत्रात विद्युत विभागाकडून निर्माण झालेली २५० शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून करोड रुपयांचा निधी मिळवून सिंचनाची समस्या सोडविणारे माजी आमदार निमकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवीत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले.
विजयी उमेदवारांचे माजी आमदार सुदर्शन निमकर, सरपंच बाळनाथ वडस्कर, गोरखनाथ शुंभ, प्रा. शंकर पेद्दूरवार, बंडू निमकर, पांडुरंग गिरसावळे, किशोर वांढरे, रमेश मायकुलकर, भाऊजी भोंगळे, मनोज पावडे, सुभाष मासिरकर, रमाकांत निमकर, पांडुरंग वडस्कर सह शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.