दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने जागतिक ग्रंथ दिन आयोजित करण्यात आला होता . हा दिन दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो . महाविद्यालयाला सार्वजनिक सुट्टी असताना देखील महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातील उत्सवाचा दिवस म्हणून अतिशय हर्ष , उल्हासात साजरा झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.सी.बी.साखरे , प्रमुख पाहुणे बालरोग तज्ञ डॉ. रामराव श्रीरामे , दंतरोग तज्ञ डॉ. पांडुरंग श्रीरामे तसेच व्यासपीठावर भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.बी.टी.पाटील , बंडू गजमल , पर्यवेक्षक प्रा.जी.एम.वायफणकर हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक ग्रंथपाल अर्जुन गजमल , सूत्रसंचालन प्रा.डॉ. सी.एम.कहाळेकर तर आभार प्रदर्शन नितीन गायकवाड यांनी केले .
महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या सत्कार समारंभाने कार्यक्रम सुरू झाला . प्रमुख पाहुणे डॉ. श्रीरामे यांनी ग्रंथ हे माणसाला दुराचार , दुराग्रह , अपप्रवृत्ती पासून दूर ठेवण्यासाठी सदैव मार्गदर्शकांच्या भूमिकेत कार्य करीत असते . ग्रंथ वाचन अखंडपणे सुरु ठेवले पाहिजे असे विचार मांडले . अध्यक्षीय भाषणात प्रा.साखरे यांनी ग्रंथालय विभागाचे व ग्रंथपाल गजमल यांचे कौतुक केले . जागतिक स्तरावर साजरा करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या उत्सवापैकी एक म्हणजे जागतिक ग्रंथ दिन होय . समाजातील वाईट गोष्टींना आवर घालून चांगल्या मार्गाची वाटचाल माणसाला ग्रंथ शिकवत असतात .ग्रंथासोबत आपली मैत्री वृध्दिंगत करावी असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गंगाधर चांडोळकर , वैशाली पाटील , श्रीराम पताळे , बालाजी चिवळे , अनिल बेलकर , निर्गुण वटपलवार , विद्यार्थी आदित्य धिरडे यांनी परिश्रम घेतले . यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
