पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला आघाडी दर्शवणारे सर्व एक्झिट पोलचे अंदाज फेटाळून लावले आहेत. आपली तृणमूल काँग्रेस (TMC) पार्टी २२६ पेक्षा जास्त जागा जिंकून सहज बहुमताचा टप्पा पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
बहुतेक एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपला कौल मिळत असल्याचे पाहून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि. ३० एप्रिल) आपल्या कार्यकर्त्यांना ४ मे रोजीच्या निकाल दिवशी मतमोजणी केंद्रांवर चोवीस तास ‘पहारा’ देण्याचे आवाहन केले. पोलस्टर्सचे अंदाज फेटाळून लावताना त्या म्हणाल्या की, त्यांचा पक्ष २२६ हून अधिक जागांसह मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहे.
कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन
एका व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित करताना बॅनर्जी यांनी संपूर्ण मतमोजणी काळात सतत सतर्क राहण्याचे आवाहन केले. सर्व २९४ मतदारसंघांतील मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि ज्येष्ठ नेत्यांनी वैयक्तिकरित्या लक्ष ठेवावे, असे त्यांनी सांगितले. “मी आपल्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला विनंती करते की त्यांनी एकजुटीने आजपासूनच मतमोजणी प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवावे. गरज पडल्यास, मी स्वतः माझ्या (भवानीपूर) मतदारसंघात पहारा देण्यासाठी बाहेर पडेल, असे त्या म्हणाल्या.
टीएमसी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी एक्झिट पोल
भाजपला फायदा दाखवणारे एक्झिट पोल हा टीएमसी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी रचलेला राजकीय डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्ही २२६ चा आकडा पार करणार आहोत हे त्यांना ठाऊक आहे. भाजपला हे माहीत आहे की ते टीएमसीचा वेग रोखू शकत नाहीत,” असेही त्यांनी नमूद केले.कार्यकर्त्यांना सूचना देताना त्या म्हणाल्या, “दिवसा कार्यकर्त्यांना कर्तव्यावर ठेवा, पण रात्रीची जबाबदारी तुम्ही स्वतः सांभाळा. पहारा द्या! जर मी पहारा देऊ शकते, तर तुम्हीही देऊ शकता. रात्रभर जागे राहा आणि सकाळी पुढच्या टीमकडे जबाबदारी सोपवल्यानंतरच विश्रांती घ्या.
२०२१ च्या निकालांची करुन दिली आठवण
मुख्यमंत्र्यांनी २०२१ च्या निवडणुकीचा दाखला दिला. त्यावेळीही एक्झिट पोलने भाजपला विजय मिळवून दिला होता, परंतु प्रत्यक्षात निकाल पूर्णपणे वेगळे लागले होते. “२०१६ मध्येही हेच घडले आणि २०२१ मध्येही याचीच पुनरावृत्ती झाली. वेळोवेळी दाखवण्यात आलेले एक्झिट पोल पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकलेले होते,” असे त्यांनी स्पष्ट केले.बॅनर्जी यांनी असा दावा केला की, मतमोजणीच्या दिवसापूर्वी लोकांची मानसिकता बदलण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून हा प्रचार केला जात आहे. “हा मीडिया प्रचार भाजपने जाणीवपूर्वक आयोजित केला आहे कारण त्यांना स्पष्टपणे दिसत आहे की ते आपल्याला रोखू शकत नाहीत.
EVM बाबत खबरदारी
तृणमूल प्रमुखानी कार्यकर्त्यांना ईव्हीएम (EVM) मशिनवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा इशारा दिला, विशेषतः स्ट्रॉंग रूममधून मतमोजणी हॉलमध्ये मशिन नेले जात असताना. “ईव्हीएम मशिन हलवण्याच्या या काळात मशिन बदलण्याचा भाजपचा कट असू शकतो,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.प्रतिकूल हवामान असूनही विक्रमी संख्येने मतदान केल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले. तसेच राजकीय दहशतीविरुद्ध “जीवावर उदार होऊन” लढणाऱ्या टीएमसी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. शेवटी, “दीदीवर आणि बंगालच्या जनतेवर विश्वास ठेवा. आपण ‘मा, माटी, मानुष’चे सरकार यशस्वीपणे स्थापन करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पश्चिम बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. दोन्ही टप्प्यांत अनुक्रमे ९३.१९ टक्के आणि ९२.६७ टक्के मतदान झाले असून, स्वातंत्र्यानंतरची ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे.
