
दैनिक चालु वार्ता उपसंपादक अमरावती -श्रीकांत नाथे
अमरावती :- पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवावी.बाधित गावांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाय अंमलात आणण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक महसूलभवनात झाली,त्यावेळी त्या बोलत होत्या.पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ,निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके,पोलीस उपायुक्त सागर पाटील,जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता रश्मी देशमुख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की,मेळघाटात पावसाळ्यात काही गावांचा संपर्क तुटतो.त्यादृष्टीने धान्य,औषधसाठा आदी तजवीज आधीच करून ठेवावी.दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी.अवकाळी पावसानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‘महावितरण’ने चांगली कामगिरी केली. त्यानुसार पावसाळ्यातही जलद सेवा राबवावी.आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत.
त्या पुढे म्हणाल्या की,प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी.ब्रिटीशकालीन तलावांच्या नियंत्रणाची जबाबदारी जिल्हा परिषदेची की जलसंधारण विभागाची याबाबत स्पष्टता निर्माण होण्यासाठी ही बाब वरिष्ठ स्तरावरून तपासून स्वतंत्रपणे आदेश तत्काळ निर्गमित करण्यात येतील.पेढी नदी खोलीकरण कामाचा पाठपुरावा करावा.मेळघाटात विशेषत: धारणी तालुक्यात पूरामुळे मनुष्यहानी होऊ नये म्हणून जलद सेवेच्या उद्देशाने बऱ्हाणपूर येथील बचाव पथक उपलब्ध होण्याबाबत तपासण्यात येईल किंवा अन्य पर्याय शोधून तत्काळ अंमलात आणावा.जिल्हा परिषद शाळांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी.
धरणातील जलसाठ्याच्या नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करावे.नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन,रेड लाईन) सीमांकन करावे,तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी.धरणातील पाणी सोडताना तहसीलदार,पोलीस व कंट्रोलरूमला २४ तास आधी कळवावे.सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी.बिनतारी यंत्रणा कार्यान्वित करावी.हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी,असेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील १ हजार ९८५ गावांपैकी संभाव्य पूरबाधित गावे ४८२ आहेत.जिल्ह्यात २०१८ ते २०२३ या काळात वीज पडून ४७ व पुरामुळे ६५ मनुष्यहानी झाली.आपत्कालीन व्यवस्थापनासाठी ३०० आपदा मित्र व आपदा सखींना प्रशिक्षण देण्यात आले आहे.यंत्रणेकडे ५ मोटर बोट,लाईफ जॅकेट,२१६ लाईफ रिंग्ज१०९ रोप बंडल,८५ सर्च लाईट,२२ मेगा फोन,ग्लोव्हज्,रेनकोट,स्कूबा डायव्हिंग कीट,हेल्मेट आदी विविध साधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत.पथकाकडून मॉक ड्रिल करण्यात आली आहे.तालुका स्तरावरही मॉक ड्रिल घेण्यात यावी,असे निवासी उपजिल्हाधिकारी श्री.घोडके यांनी सांगितले.