
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.20 तारण ठेवलेला लॅपटॉप परत मागितल्याच्या कारणातून दोघांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे.
याप्रकरणी संजय कारभारी शिंदे (वय ३१ ) आणि शंकर हरीदास साबळे (वय २०, रा. दोघेही चंदननगर) या दोघांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खंडणी, मारामाऱ्या असे प्रकार शहरात वाढताना दिसत असून असाच आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये दोघांनी दांम्तप्याला बेदम मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत एका २४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिलेचा पती रोशन उसाकोयल याने संजय कारभारी शिंदे यांच्याकडून व्याजाने रक्कम घेतली होती. त्याबदल्यात लॅपटॉप त्याच्याकडे तारण म्हणून दिला होता. १७ मे रोजी हे दांम्पत्य संजयकडे लॅपटॉप मागण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्यामुळे त्याने रोशनला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली.
भांडणात मध्यस्थी करताना शस्त्राचा वार महिलेच्या दंडाला लागला. त्यानंतर आरोपी शंकरने चाकूने दाम्पत्याला धमकावून जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास चंदननगर पोलीस करत आहेत.