
आमदार जितेश अंतापुरकर यांनी विधिमंडळात मांडला प्रश्न…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:सततच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला येत आहेत. त्याचवेळी अतोनात खर्च करून कष्टाने जगविलेली पिके वन्यप्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. बिलोली तालुक्यातील व देगलूर तालुक्यातील हाणेगाव शहापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन मूग उडीद पिकाची हरीण व रानडुकरांनी नासाडी केली.यांचे पीक जोमात असतांनाच रात्री, अपरात्री रानडुकरांनी संपूर्ण शिवारात हैदोस घातला आहे. हाणेगाव शहापूर शिवारात डोंगरमाथ्याच्या शेजारी व परिसरात हरीण रानडुकरांसह मोर व इतर वन्यप्राण्यांचा धुमाकुळ सुरू आहे. बरेच शेतकरी रात्र जागून पिकाची राखण करीत आहे. मात्र, वन्यप्राणी नासाडी करतात त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. वन्यप्राण्यांकडून पिकांची नासाडी होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. याकडे वन विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन नुकसानीची पाहणी करावी. संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसेच वन्यप्राण्यांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांनी मुंबई येथे चालू पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडला व सभापती महोदयांना यावर लवकरात लवकर शेतकऱ्यांना कशी मदत दिली जाईल याकडे लक्ष घालावे अशी विनंती केली.