
- जालना प्रतिनिधी:आकाश माने
जालना -सोमवारी मुस्लिम समाजाचा बकरी ईद हा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी “कुर्बानी” म्हणून अनेक जनावरांची कत्तल केल्या जाते. दरम्यान कत्तल करण्यासाठी प्रतिबंध असलेल्या गोवंशाची देखील मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या कत्तल केली जाते. त्यामुळे असा प्रकार घडू नये म्हणून बजरंग दलाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत, आणि अशा गोवंशाची वाहतूक करणारे वाहन पकडून पोलिसांच्या स्वाधीन करीत आहेत. तीन दिवसांपूर्वीच चंदंनझीरा पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारची 11 जनावरे पकडण्यात आली होती आणि आज शनिवारी देखील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशाची वाहतूक करणारे दोन वेगवेगळी वाहने पकडण्यात आले आहेत एका वाहनात तीन तर एका वाहनात चार गोवंशाची वाहतूक केली जात होती. दरम्यान यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष एड. राहुल नार्वेकर यांनी पोलीस महासंचालकांना पत्र देऊन बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर मालेगाव, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे, सोलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची हत्या करण्यात येते ,तसेच गोरक्षकांवर देखील हल्ला होण्याची शक्यता असून योग्य ती कारवाई करावी अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याचे नाव जरी या यादीत नसले तरी पोलीस प्रशासन मात्र अलर्ट झाले आहे आणि अतिरिक्त कुमक सदर बाजार पोलीस ठाण्यात मागविली आहे.
नवीनच स्थापन झालेल्या गोसेवा आयोगाच्या निर्देशानुसार तसेच पशुसंवर्धन विभागाच्या आदेशानुसार सर्व जनावरांच्या कानाला टॅग असणे बंधनकारक केले आहे. त्याचसोबत बकरी ईद निमित्त ज्या जनावरांची कत्तल करण्यात येते त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देखील आवश्यक करण्यात आले आहे .या सदर्भात सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सविस्तर माहिती दिली आहे.