
प्रतिनिधी : श्री रमेश राठोड
यवतमाळ:-आर्णि तालुक्यातील येत असलेल्या सावळी सदोबा परिसरातील साखरा तांडा येथील पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या १७ वर्षीय युवकाचा वीज कोसळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास साखरातांडा (ता. आर्णी) शिवारात घडली. भागवत जीवन चव्हाण, असे मृताचे नाव आहे.
दहावीत उत्तीर्ण झाल्याने भागवत चव्हाण याने अकराव्या वर्गात प्रवेश घेतला होता. तो सकाळी
मजुरांसोबत नातेवाइकाच्या शेतात टोपणीसाठी गेला होता. दुपारी वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी भागवत व इतर मजुरांनी वेगवेगळ्या ठिकाणी आसरा घेतला. भागवत थांबून असलेल्या झाडाजवळ वीज कोसळल्याने तो गंभीर झाला. हा प्रकार लक्षात येताच मजुरांनी गावात माहिती दिली. त्याला तातडीने ऑटोरिक्षाद्वारे सावळी सदोबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार यवतमाळ येथे हलविताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.