
वैजापूर प्रतिनिधी :भारत पा.सोनवणे-
*छत्रपती संभाजीनगर-* वळदगावमध्ये तलवार घेऊन फिरणाऱ्या एकाला सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्या माहितीवरून सातारा पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या वाळूज एमआयडीसीतील आरोपीच्या घरातून धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला. दोन एअरगन, दोन गुप्ती आणि दोन चाकू जप्त केल्याची माहिती १४ जून रोजी पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
नीलेश अनिल शीलवंत (२५, रा. वळदगाव), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. याशिवाय, आधीच खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या शिवाजी प्रकाश दूधमोगरे (रा. कमळापूर, एमआयडीसी वाळूज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, विशेष पथकाचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे हे त्यांच्या पथकासह धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वळदगाव येथे अवैध धंद्याच्या कारवाईसाठी गेले. त्याचवेळी काळा शर्ट, जिन्स पॅन्ट घातलेला व दाढी वाढलेला एकजण तलवार घेऊन फिरत असल्याची खबर त्यांना मिळाली. पथकाने तेथे छापा मारून नीलेश शीलवंतला पकडले. त्याच्या ताब्यातून एक तलवार जप्त केली. या शस्त्राबाबत त्याला अधिक विचारपूस केली असता त्याने ही तलवार त्याचा मित्र शिवाजी दूधमोगरे याच्याकडून घेतल्याचे सांगितले. तसेच, त्याच्या घरात आणखी शस्त्रांचा साठा असल्याची माहिती दिली. दरम्यान, पथकाने दूधमोगरेच्या घरी छापा मारला. तेथून दोन एअरगन, दोन गुप्ती, दोन चाकू, असा साठा जप्त केला. तसेच, दूधमोगरे हा आधीच खुनाच्या गुन्ह्यात अटक असल्याचे समोर आले.