
विनापरवानगी मनोज जरांगे-पाटील यांची सभा घेत गर्दी जमविल्याप्रकरणी लासलगाव आणि खडक माळेगाव येथील युवकांवर आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
खडक माळेगाव आणि लासलगाव येथे शनिवारी (दि.१६) रात्री साडेदहाच्या सुमारास जरांगे-पाटील यांची सार्वजनिक रस्त्यावर सभा घेतली गेली होती. याठिकाणी सुमारे ५००-६०० नागरिकांची गर्दी झाल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा वापर केल्याने आचारसंहितेचा भंग झाला म्हणून येवला पंचायत समितीचे दीपक सोनार व सहायक प्रशासन अधिकारी अण्णासाहेब पैठणकर यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लासलगाव येथील जयदत्त होळकर, प्रवीण कदम, डॉ. विकास चांदर, उत्तम कदम, डॉ. सुजित गुंजाळ, ललित दरेकर (रा. निमगाव वाकडा), प्रसाद फापाळे, तर खडक माळेगाव येथील विकास रायते, विक्रम शिंदे, राकेश रायते, गोकुळ शिंदे, सागर रायते, योगेश रायते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे, पोलिस उपनिरीक्षक पवन सुपनर तपास करत आहेत.