
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानपार पडणार आहे. राज्यातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात या निवडणुका पार पडत आहे. प्रचारात आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर आज उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
मतदानासाठी मतदारांचा उत्साह दिसत असून सुरुवातीच्या पहिल्या पाऊण तासात राज्यातील काही ठिकाणी ईव्हीएम बिघाड झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया खोळंबली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात 4 ठिकाणी मतदान केंद्रात बिघाड
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्ह्यात 4 ठिकाणी मतदान प्रक्रिया खोळंबली आहे. पीर बावडा फुलंब्री मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे. 2 ठिकाणी कंट्रोल युनिट बिघाड झाला आहे. 1 ठिकाणी व्हीव्हीपॅट, 4 ठिकाणी बॅलेट मशीनमध्ये बिघाड झाला आहे.
मुंबईतील शिवडीमध्येही EVM मशीन बंद, मतदार खोळंबले
शिवडी-लालबाग विधानसभा मतदारसंघातील आरएम भट शाळेतील मतदान केंद्र EVM क्रमांक 41 क्रमाकाची मशीन बंद असल्याचे आढळले. प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे EVM मशीन सुरू झाल्या नसल्याची माहिती समोर आली आहे.
जळगावच्या जामनेरमधील मतदान केंद्रावर EVM मशीन सुरू होईना
जळगावच्या जामनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर evm मशीन सुरू होत नसल्यामुळे पंधरा ते वीस मिनिट मतदानाला विलंब झाला. कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या वतीने मशीन सुरू करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आली. 15 ते 20 मिनिटानंतर मशीन सुरू झाल्यानंतर त्याला सिल करण्यात आले आणि मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मशीन सुरू होईपर्यंत मतदानासाठी आलेले नागरिक व महिला बाहेर थांबून होते.
नाशिकच्या येवल्यातही मतदान यंत्रात बिघाड
नाशिकच्या येवल्यातही मतदान यंत्रात बिघाड झाला. सेक्टर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जनता महाविद्यालयातील मतदान यंत्रात बिघाड झाला. यावेळी मतदारांची रांग दिसून आली.
पंचवटीतील मतदान केंद्रावर बिघाड
पंचवटीतील सोनुबाई केला मतदान केंद्रावरील 189 बूथवर तांत्रिक बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला 20 मिनिट उशीर झाला.
दादर परिसरातील नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद…
मुंबईच्या दादर परिसरातील नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडले. मतदान सुरू होऊन अवघे 15 मिनिटे झाले असताना मशीन बंद पडले. यामुळे मतदारांचा खोळंबा झाला.
अकोल्यात EVM मशीनमध्ये बिघाड, मतदानाला सुरुवात नाही
बाळापुर मतदार संघातील वाडेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 208 वर अद्यापही मतदानाला सुरुवात नाही. तांत्रिक बिघाडामुळे अजूनही मतदानाला सुरुवात झाली नाही.