
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीकडून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
अशातच तावडेंकडे किती पैसे सापडले याची माहिती पोलीस, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तावडे पाच कोटी रुपये घेऊन आले होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला होता. तर हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंची डायरी दाखवत त्यात १५ कोटी रुपये वाटल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले होते. निवडणूक आयोगाच्या पथकाला ठाकूर समर्थकांनी तावडेंकडे (Vinod Tawde) सापडलेले पैसे दिले, त्याचा आकडा आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.
लोकमतच्या वृत्तानुसार, रुममध्ये एफएसटी टीमने केलेल्या तपासणीत ९,९३,५०० एवढी रक्कम सापडली आहे. याठिकाणी जी अनधिकृत पत्रकार परिषद झाली त्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तर जे काही इथे अनधिकृत पैसे आढळून आले आहेत त्याविरोधात १७३ बीएनएस व इतर कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे पोलीस अधिकारी पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.