
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी ५ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर नियोजित आहे. शपथविधीला निव्वळ ७२ तास राहिलेले असताना शरद पवार गटाचे भिवंडीचे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचले आहेत.
त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना पुन्हा सुरुवात झाली आहे.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले असले तरी त्यांच्या नावावर अधिकृतरित्या शिक्कमोर्तब करण्यात आलेले नाही. त्यांच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होणार का? हा प्रश्नही अद्याप निकाली निघालेला नाही. मंत्रिमंडळातील समावेशावरूनही अजून चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत सागर बंगल्यावर काँग्रेस वगळता इतर पक्षांतील नेत्यांची ये जा सुरू आहे.
शरद पवार गटाचे खासदार बाळ्यामामा फडणवीस यांच्या भेटीला
शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे आणि अजित पवार गटाचे खासदार धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांच्या भेटीचे कारण अद्याप कळू शकलेले नसले तरी बाळ्या मामा म्हात्रे शुभेच्छा देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भेटीगाठींचा सिलसिला सुरू
विशेष म्हणजे बाळ्या मामा म्हात्रे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पराभूत करून लोकसभेत पाऊल ठेवले. लोकसभा काळात बाळ्या मामा आणि भारतीय जनता पक्षातील संघर्ष राज्यात गाजला. असे असले तरी निवडणूक काळातील संघर्ष पुलाखालून पाणी वाहून गेल्याप्रमाणे नाहीसा झाला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतरच्या बदलेल्या परिस्थितीत मतदारसंघातील कामे आणि स्थानिक प्रश्न लक्षात घेणे भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आहे.
गृह, अर्थ, महसूल, नगरविकास, ऊर्जा, कोणती खाती कुणाकडे?
दुसरीकडे सत्तावाटपाच्या अंतिम चर्चेसाठी तीनही पक्षाचे नेते सोमवारी सायंकाळी नवी दिल्लीला जाणार असल्याची माहिती कळत आहे. एकनाथ शिंदे गेली दोन दिलस आजारी असल्याकारणाने आणि मूळगावी दरे मुक्कामी गेल्याने सत्तावाटपाची उर्वरित चर्चा झालेली नाही. त्यामुळे गृह, अर्थ, महसूल, नगरविकास, ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांवर असलेला तिढा सुटलेला नसल्याने आजच्या बैठकीत यावर चर्चा होणे अपेक्षित असल्याचे सांगितले जाते.
दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री निश्चित आहे मात्र एकनाथ शिंदे यांचा मंत्रिमंडळात नक्की काय रोल असणार आहे, उपमुख्यमंत्री म्हणून ते मंत्रिमंडळात सहभागी होणार आहेत का, की राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांप्रमाणे श्रीकांत शिंदे यांना राज्यात आणण्याचे त्यांचे नियोजन सुरू आहे, याविषयी देखील आज स्पष्टता येण्याची शक्यता आहे.