
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी केवळ काही तासांचा कालावधी उरलेला असताना एकनाथ शिंदे यांचे अजूनही ठरलेले नाही. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायचे की नाही, यावर अजूनही निर्णय झालेला नाही.
त्यामुळे सायंकाळी ते शपथ घेणार की नाही, याबाबतचा संभ्रम वाढला आहे. शिंदे मंत्रिमंडळात नसतील तर आम्हीही नसू, असे संकेत सामंतांनी दिले आहेत.
उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, आज उपमुख्यमंत्रिपदाबाबत आमच्या आमदारांची नावे येत आहेत. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची मागणी आहे. आम्ही त्यांना काल विनंती केली आहे, ते त्याचा विचार करतील. ते आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
आमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनीच हे पद स्वीकारावे, ही आमची इच्छा आहे. आम्हाला त्यावर विश्वास असून पुढील अर्धा-एक तासांत ते आमची इच्छा पूर्ण करतील. हे दबावतंत्र नाही. त्यांनी आधीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी आणि खातेवाटप याचा काहीही संबंध नाही. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापेक्षा संघटन वाढवण्याची शिंदेंची इच्छा आहे. पण आम्ही त्यांना याबाबत विनंती केली आहे.
शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर आम्हीही मंत्रिपद स्वीकारणार नाही. शिंदे सोडून उपमुख्यमंत्री होण्यास कुणीची इच्छूक नाही. आम्ही भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच प्रयत्न करतील, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मोदी आणि शहांचे सगळं ऐकतात. त्यांचा एक मेसेज आला तर ते नक्की विचार करतील. आम्हीही त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची काल विनंती केली आहे. त्याचा सकारात्मक विचार करतील, असे केसरकर यांनी सांगितले.