
नव्या सरकारच्या शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना आता एक अत्यंत मोठी घडामोड घडली आहे. मागील अनेक दिवसांपासून नाराज असलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता अखेर भाजपचं म्हणणं मानलं आहे.
नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार झाले आहेत. मागील काही दिवसांपासून शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले होते. त्याशिवाय आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं.
मात्र, आता शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास तयार झाले आहेत. यासंबंधीचं पत्र हे आता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना देण्यात आलं आहे.
शिवसेना नेते उदय सामंत यांनी याबाबतचं पत्र हे राज्यापालांना दिलं आहे. त्यामुळे आता शिवसेना सत्तेत सहभागी होणार असल्याचं निश्चित झालं आहे.
एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद मिळणार?
दरम्यान, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार झालेले असले तरीही त्यांना गृहमंत्री पद मिळणार की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. काल देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या बैठकीत शिंदेंनी गृहमंत्री पद मिळालं तरच आपण उपमुख्यमंत्री पद स्वीकारू असं म्हटलं होतं.
ज्यावर फडणवीसांनी हायकमांडशी बोलून आपल्याला कळविण्यात येईल असं शिंदेंना सांगितलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी गळ घातली होती.
अखेर या सगळ्या घडामोडीनंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास आपली तयारी दर्शवली. पण त्यांना भाजप गृहमंत्री पद देणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.