
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी भविष्यवाणी करणारे मनसे अध्य राज ठाकरे शपथविधी सोहळ्याला वैयक्तिक कारणामुळे हजर राहू शकले नाहीत. मात्र शपथविधी झाल्यानंतर काही मिनिटातच समाज माध्यमावर शुभेच्छापर पोस्ट लिहून त्यांनी नव्या सरकारचे अभिनंदन केले.
यावेळी फडणवीस यांचे कोडकौतुक करताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला..!
आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली, असे राज म्हणाले.
यावेळी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले, असे म्हणत राज यांनी एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे चिमटा काढला.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या करिश्म्यामुळेच निर्विवाद यश मिळाल्याचे त्यांनी थेटपणे अधोरेखित केले.
मिळालेल्या बहुमताचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी योग्य वापर कराल अशी आशा राज ठाकरे यांनी फडणवीस यांच्याकडून व्यक्त करतो.
पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठिंबा असेल असे सांगताना सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की, असा इशाराही दिला.
सरतेशेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या.
शपथविधीनंतर नवे सरकार लगोलग मंत्रालयात!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केल्यानंतर मंत्रालयात प्रवेश केला. यावेळी या तिघांचेही सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर मुख्यमंत्रीफडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी मंत्रालय प्रांगणातील राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देशिकेलाही अभिवादन केले.