बीडमधील मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने फक्त जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं आहे. या प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे कथित निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे.
आता, खुद्द अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मस्साजोग प्रकरणातील आरोपींना अटक होण्यास उशीर होत असल्याने लोकांमध्ये संतापाची लाट असल्याचे सांगत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले की, मुख्यमंत्री इतर नेत्यांनी वारंवार आम्ही नि:पक्षपणे चौकशी करू असे सांगितले. परंतु 19 दिवसानंतर आरोपी पकडले जात नाहीत, त्यामुळे बीडच्या जनतेत उद्रेक आहे. या प्रकरणातील आरोपी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यांना पकडण्यात एवढी दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य माणूस अस्वस्थ असल्याचे सोळंके यांनी म्हटले.
वाल्मिक कराड कार्यकारी पालकमंत्री…
प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराडबाबत भाष्य करताना गंभीर वक्तव्य केले. धनंजय मुंडे राज्याचे मंत्री होते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांनी जी व्यवस्था निर्माण केली, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड हे महत्त्वाचे नाव होते. काही वर्तमानपत्रात वाल्मिक कराड यांना कार्यकारी पालकमंत्री असे म्हटलं आहे. इतक्या स्तरावर ही चर्चा होती, असेही त्यांनी म्हटले.
प्रकाश सोळंके यांनी पुढे म्हटले की, धनंजय मुंडे 4 वर्षे पालकमंत्री असताना त्यांनी पूर्ण अधिकार वाल्मिक कराडांना दिले होते. कार्यकारी पालकमंत्री म्हणून काही वर्तमानपत्रांनी वाल्मिक कराडचं कौतुक केलं होतं. जे काही घडले त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांची कार्यपद्धती जबाबदार आहे असं आपल्याला वाटत असल्याचा आरोपही प्रकाश सोळंके यांनी केला.
सगळीकडे कराडचा हस्तक्षेप…
अनेक प्रशासनातील अधिकारी आता सांगतात की वाल्मिक कराडचा प्रत्येक ठिकाणी हस्तक्षेप होता. कुठल्या विभागाच्या अधिकार्यांना डायरेक्ट आदेश देऊन काम करायला लावण्याची प्रथा-परंपरा वाल्मिक कराडची होती. संतोष देशमुखची हत्या झाली, त्याला देखील खंडणीच कारणीभूत असल्याकडे प्रकाश सोळंके यांनी लक्ष वेधले.
अजितदादांना सांगितलं पण…
प्रकाश सोळंके यांनी म्हटले की, अनेकदा अजितदादांना भेटून बीडमधील सामाजिक राजकीय परिस्थिती कानावर घातली होती. धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांना सांगितले होते. मस्साजोगचे प्रकरण झाल्यानंतर आरोपींना अटक होत नाही म्हणून लोकांमध्ये प्रचंड आक्रोश असून काहीतरी करा, अशी विनंतीही केली होती, असे सोळंके यांनी सांगितले.
