माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांचे सुरक्षारक्षक काकड यांनी जागविल्या आठवणी..
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे नुकतेच निधन झाले. अनेक वर्षे त्यांचे सुरक्षारक्षक म्हणून त्यांच्याबरोबर राहिलेले ‘बीएसएफ’चे निवृत्त सहाय्यक कमांडंट साहेबराव काकड यांनी डॉ. सिंग यांच्याविषयीचे अनुभव सांगितले आहेत.
ते म्हणतात, माजी पंतप्रधान डॉ. सिंग यांचे प्राथमिक शिक्षण आजच्या पाकिस्तानात झाले असल्याने त्यांची भाषणे ऊर्दूत लिहिली जायची. उच्चशिक्षित आणि सर्वोच्च पदावर असूनही ते अगदी साधा आहार घेत होते.
विशेष म्हणजे, वरिष्ठ पातळीवरील बैठकीत आपल्या ग्लासमध्ये असलेली वाईन ते सुरक्षारक्षकांना काढून घ्यायला सांगायचे. त्या ग्लासमध्ये फक्त साधे पाणीच असायचे, असा खुलासाही त्यांनी केला. साहेबराव काकड हे सन १९९९ ते २०१५ या कार्यकाळातील सर्व पंतप्रधानांचे सुरक्षारक्षक राहिले आहेत. नाशिकमधील मखमलाबाद येथील ते रहिवासी आहेत.
काकड पुढे म्हणतात, की परदेशात शिक्षण होऊन आणि अनेक देशांमध्ये भ्रमण करूनही त्यांचा आहार हा शुद्ध आणि सात्त्विक म्हणजेच संपूर्ण शाकाहार होता. नाश्त्यात अगदी भोपळा किंवा कुठलीही साधी भाजी व दोन पोळ्या, पपई आणि दूध एवढेच. पंतप्रधान म्हणून अनेक परदेशी समकक्ष किंवा अधिकाऱ्यांबरोबर शिष्टाचार भोजन घेत असताना बऱ्याचदा वाईन त्यांच्याबरोबर घेतली जाते; परंतु मनमोहनसिंग यांच्या ग्लासमध्ये पाणी असायचे.
त्या ग्लासमधील वाईन काढून घेण्याची जबाबदारी सुरक्षा अधिकाऱ्यांची असे. अनेकदा मी स्वतः त्यातली वाईन काढून त्यात पाणी ठेवले आहे. घेण्यापूर्वी ते अधिकाऱ्यांकडे पाहायचे आणि वाईन काढून घेतली आहे, अशी खूण केल्यावरच त्या ग्लासला हात लावायचे. पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी अनेक प्रोटोकॉल्स असतात. सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना ते एवढ्या उच्च पदावर असूनही निमूटपणे ऐकत असत, असेही काकड यांनी सांगितले.
वेगाने चालण्याची सवय
उच्चशिक्षित असलेले डॉ. सिंग प्रचंड धार्मिक होते. आपल्या व्यस्त जीवनशैलीतून वेळ काढून गुरुद्वारात अनेकदा हजेरी लावत. त्यांच्या चालण्याचा वेग हा इतर अधिकारी व मंत्र्यांपेक्षा जास्त होता. बऱ्याचदा त्यांच्या पत्नी गुरशरण कौर या मागे राहत. सुरक्षा अधिकाऱ्यांनी आठवण करून दिल्यावर सिंग हे थांबून त्यांची वाट पाहत. अत्यंत साधी राहणी व कर्मचारी, अधिकारी यांच्याशी आपुलकीच्या वागणुकीमुळे ते सदैव स्मरणात राहतील.
