बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात चेकिंगदरम्यान पोलिसांच्या नजरेस एक महागडी आलिशान कार दिसताच सर्व पोलीस चकित झाले. सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या फॉर्च्युनर कारमध्ये दोन जण बसले होते.
उपनिरीक्षक आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अन्य पोलिसांनी कारची झडती घेतली. तेव्हा आतील दृश्य वेगळेच होते. पोलिसांनी तात्काळ दोघांना खाली उतरवून अटक केली.
बिहारमधील गोपालगंज पोलिसांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने दारूची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील सदस्य फॉर्च्युनर कारचा वापर करून दारूची तस्करी करत होते. या वाहनावर भाजपचा झेंडा लावून ते लपवण्याचाही प्रयत्न करत होते. कुचायकोट पोलीस ठाण्यांतर्गत बलथरी चेकपोस्टवर वाहन तपासणीदरम्यान पोलिसांनी दोन तस्करांना अटक केली आणि त्यांच्या ताब्यातून 261 लीटर दारू जप्त केली.
पोलिसांनी जप्त केलेले फॉर्च्युनर हे वाहन 261 लीटर दारूची तस्करी करण्यासाठी वापरले जात होते. ही दारू यूपी-बिहार सीमेवरील बलथरी चेकपोस्टजवळील तस्करीच्या नेटवर्कचा भाग होती. पोलिसांच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर बलथरी चेकपोस्टवरील सुरक्षा आणि पाळत अधिक कडक केली.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही तस्करांची नावे आहेत रोहित कुमार गोंड आणि सोनू पांडे, रोहित कुमार हा कुशीनगर जिल्ह्यातील मंगलपूरचा रहिवासी आहे तर सोनू देवरिया जिल्ह्यातील कटारी गावचा रहिवासी आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
नवीन वर्षाच्या उत्सवादरम्यान गुन्हेगार कसे दारूच्या अवैध तस्करीला प्रोत्साहन देत होते हे या घटनेवरून दिसून येते, परंतु पोलिसांच्या सतर्कतेने ते हाणून पाडले.
