
वडेट्टीवार फडणवीसांवर संतापले, नितेश राणेंवर हल्लाबोल…
केरळ राज्य हे मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी तिथून निवडून येतात, असे वादग्रस्त वक्तव्य मत्स्य आणि बंदरे विकाससंत्री नितेश राणे यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा वादंग उभा राहिला असून काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत त्यांना सुनावले आहे.
तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे.
केरळ सारख्या भारतातील एका प्रगत राज्याला मिनी पाकिस्तान बोलणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल विचारून महायुतीचे मंत्री ज्या पदावर बसले आहेत, त्या पदाचा सन्मान राखायला शिकायला हवे. ही भाषा केवळ एका राज्याचा अपमान नसून भारताच्या एकात्मतेवरही हल्ला असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नितेश राणे यांच्यावर केली.
गुंडगिरी करणाऱ्यांनाच मंत्री बनवू अशी अट आहे काय?
महायुतीच्या नेत्यांकडून वेळोवेळी अशी प्रक्षोभक वक्तव्ये केली जातात, जी समाजात द्वेष निर्माण करतात. जर केरळ “पाकिस्तान” असेल, तर केंद्र सरकार काय करत आहे? असा रोकडा सवाल उपस्थित करीत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अतिरेकी मतदान करतात अशी मुक्ताफळे भाजपचे मंत्री उधळत आहे, हा मतदारांचा अपमान नाही का? असेही वडेट्टीवार यांनी विचारले
गुंडगिरी आणि प्रक्षोभक भाषा वापरून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांनाच आम्ही मंत्री बनवू, या पात्रतेवर महायुतीचे राज्यात मंत्रिमंडळ बनले आहे. त्यामुळे वेळोवेळी असे वक्तव्य करून आपली पात्रता सिद्ध करण्याची स्पर्धा महायुतीत लागलेली दिसत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. तसेच पात्रता सिद्ध करण्याच्या शर्यतीत आपली बुद्धी गमावलेल्या महायुतीच्या मंत्र्यांकडून महाराष्ट्रातील जनतेने कसली अपेक्षा न करणे योग्य, अशी उपसहात्मक टीकाही त्यांनी केली.
नितेश राणे नेमके काय म्हणाले होते?
सासवड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना नितेश राणे यांनी हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये जान भरली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनो तुम्ही एकटे नाही. आम्ही सरकार म्हणून तुमच्या सोबत आहोत. राज्यात भगवादारी मुख्यमंत्री म्हणून तिथे आहेत. त्यामुळे हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्याला काही घाबरण्याची गरज नाही. केरळमध्ये हिंदूंची कमी होत चाललेल्या लोकसंख्येची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. हिंदूंचे ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये धर्मांतर करणे ही तिथे रोजची गोष्ट बनली आहे, असे सांगत केरळ हा मिनी पाकिस्तान असून म्हणूनच तिथे राहुल-प्रियांका निवडून येतात, असे नितेश राणे म्हणाले.