
दोन्ही ठाकरे एकत्र येणार ? बैठकीत काय घडलं ?
विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर मनसेने आता महानगरपालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. यातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत विभाग अध्यक्षांची बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. तर विधानसभा निवडणुका विसरा आणि महानगरपालिकेच्या तयारीला लागा, असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसे पुन्हा एकदा ताकदीने मैदानात उतरणार आहे. यासाठी मनसे नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार आहे. निवडणुकीत मनसेची वाटचाल, इतर पक्षांसोबतच्या युतीबाबत राजकीय आढावा घेणार्या टीमचं मत लक्षात घेतले जाणार आहे.
शिवसेनेत फुट पडल्यानंतर ठाकरे आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात होत्या. विधानसभेत युती का झाली नाही ? त्यावेळी काय चर्चा झाल्या ? कशामुळे नुकसान झालं याचा आढावा मनसेच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मनसे पुढे काही पावले उचलणार का ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, विधानसभेची युती एकनाथ शिंदे यांच्या मुळे फिस्कटली असल्याचा सुर मनसेच्या नेत्यांकडून बैठकीत बघायला मिळाला. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आपण महायुतीत गेलो नाही, असे मत काही नेत्यांनी बैठकीत मांडलं. तसेच त्यांच्यामुळेच आपल्याला फटका बसला, असंही काही नेत्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काही काळात काय राजकीय घडामोडी घडणार ? ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.