
तरी अपक्ष लढून शिंदेंना ताकद दाखवलेला नेताच रवीद्र चव्हाणांनी फोडला ?
विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी आपली ताकद बंडानंतर उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का देत तब्बल 57 आमदार निवडून आणले. पण याच मुत्सद्दी शिंदेंना त्यांच्याच कट्टर नेत्यानं विधानसभेला अपक्ष लढवून ताकद दाखवून दिली होती.
यानंतर शिंदेंनीही एक पाऊल मागे घेत मग या नेत्याला पुन्हा शिवसेनेत घेतलं होतं. मात्र,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजपनं य एकनाथ शिंदेंच्या याच शिलेदाराला फोडल्याची माहिती समोर येत आहे.
भाजप नेते रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर आगामी स्थानिकच्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.विरोधी पक्षासह महायुतीतील मित्रपक्षांतील नाराज किंवा काठावरच्या नेत्यांना पक्षात आणण्यासाठी रविंद्र चव्हाणांनी गळ टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गणेशोत्सवाच्या काळात थेट खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातील कट्टर समर्थक राहिलेल्या महेश गायकवाड यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं.त्यावेळी दोघांचे फोटो व्हायरल झाले होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या आधीच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.युती धर्म न पाळल्यामुळे शिंदे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केलेल्या महेश गायकवाड यांनी कल्याण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढत 55 हजारांहून अधिक मतं मिळवत सर्वांनाच धक्का दिला होता.
कल्याण मतदारसंघात मोठा दबदबा असलेल्या महेश गायकवाड यांनी एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून देतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारालाही तिसर्या क्रमाकांवर ढकललं होतं.मग शिंदेंनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 8 महिन्यानंतर गायकवाडांना पुन्हा पक्षात आणलं. पण आता हेच महेश गायकवाड भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाणे जिल्हा जसा बालेकिल्ला समजला जातो.तसा खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे.पण याच मतदारसंघात दीड वर्षांपूर्वी तत्कालीन भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.या घटनेनं कल्याण शहरच नव्हे,तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
एकीकडे भाजपचे माजी आमदार असलेल्या गणपत गायकवाड हे याच गोळीबार प्रकरणी तुरुंगात आहेत. कल्याण मतदारसंघातून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत.पण एकीकडे गणपत गायकवाड यांच्याशी टोकाचा संघर्ष असतानाही महेश गायकवाड कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंना जय महाराष्ट्र करत भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला. त्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स आता चांगलाच वाढला आहे. मुंबई महापालिकेसह उपनगरांतील निवडणुकीसाठी आता भाजपने देखील मैदानात पाऊल टाकले आहे. या महापालिका निवडणुकींसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपनं कंबर कसली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं मोठी रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.