पालघर प्रतिनिधी – मिलिंद चुरी
बोईसर : आत्म्याच्या अंतरंगातील प्रकाश आणि रंगांची अनुभूती देणारा ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल – कलर्स ऑफ द लाईट विथिन’ हा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम बोईसरमध्ये रंगला. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सादरीकरण रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील ब्रह्माकुमारीजच्या ‘दिव्य प्रकाश कला व संस्कृती समूहाने’ केले.
दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता कुरगाव येथील विराज इंटरनॅशनल स्कूलच्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम पार पडला. भारतीय शास्त्रीय नृत्य, रशियन लोकनृत्य, नाट्याविष्कार, संगीत आणि मार्गदर्शित ध्यान यांचा सुरेख संगम या सादरीकरणात अनुभवायला मिळाला.
होळीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या या कार्यक्रमाने रंगांना केवळ उत्सवाचे प्रतीक न मानता अंतर्मनातील जागृतीचे रूप दिले. “आपल्या आतल्या प्रकाशाला जागृत करा” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला. होळी हा बाह्य रंगांचा नव्हे, तर अंतर्गत परिवर्तनाचा उत्सव आहे, हे या सादरीकरणातून अधोरेखित केले.
या उपक्रमाची संकल्पना विराज प्रोफाइल्सचे अध्यक्ष तथा सीएमडी नीरज कोच्चर यांच्या पुढाकारातून साकार झाली. भारत आणि रशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करणे, तसेच भारतीय संस्कृती, शास्त्रीय नृत्यशैली आणि आध्यात्मिक ज्ञानाला परदेशात विशेषतः रशियात मिळणारा सन्मान अधोरेखित करणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
‘दिव्य प्रकाश कला व संस्कृती समूह’ भारतीय भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यशैलीचा रशियन लोककला आणि रंगभूमीशी सुंदर संगम घडवतो. हा संगम भारत-रशिया दीर्घकालीन सांस्कृतिक नात्याचे प्रतीक ठरला. कला ही सभ्यतांना जोडणारा सेतू आहे आणि भारताची आध्यात्मिक परंपरा जागतिक पातळीवर आदराने स्वीकारली जाते, हे या सादरीकरणातून प्रकर्षाने जाणवले.
सेंट पीटर्सबर्ग (रशिया) येथील ब्रह्माकुमारीज केंद्राच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला ‘दिव्य प्रकाश कला व संस्कृती समूह’ हा विविध पार्श्वभूमीतील व्यावसायिक कलाकारांचा समूह आहे. सर्व सदस्य राजयोग ध्यानाचा नियमित अभ्यास करतात. त्यांच्या सादरीकरणांमध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य, रशियन लोककला, संगीत, नाट्य आणि आध्यात्मिक कथाकथनाचा समावेश होता. कलेच्या माध्यमातून एकता, सुसंवाद आणि आध्यात्मिक जागरूकतेचा संदेश देणे हे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे सादरीकरणातून जाणवले.
कार्यक्रमात रशियाचे सन्मानित कलाकार आणि प्रसिद्ध गायक अल्बर्ट असदुलिन यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. १९८८ साली त्यांना “रशियाचे सन्मानित कलाकार” ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. ‘गोल्डन ऑर्फियस’सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवले असून जाझ, पॉप आणि रॉक संगीतविश्वात त्यांची उल्लेखनीय नोंद आहे. ते “पीटर्सबर्ग कॉन्सर्ट” या स्टेट फिलहारमोनिक कॉन्सर्ट एजन्सीचे प्रमुख एकल गायक असून २००४ पासून ब्रह्माकुमारीजशी संबंधित आहेत.
मुख्य नृत्यदिग्दर्शिका अन्ना पुस्टोवोइट यांनी ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल’साठी रशियन अभिव्यक्ती आणि भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेचा अनोखा संगम साकारला. मंचीय कलेशी नाते जपलेल्या अन्ना यांनी युरोपमधील विविध प्रयोगांचे दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी केली आहे.
रशियातील ब्रह्माकुमारीज सेवांच्या अग्रणी बीके संतोष दीदी यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक उंची लाभली. १९९० साली रशियात ब्रह्माकुमारीज सेवांची सुरुवात करणाऱ्या अग्रदूतांपैकी त्या एक आहेत. ३५ हून अधिक देशांत आध्यात्मिक नेतृत्व दिल्याबद्दल त्यांना व्यापक सन्मान प्राप्त झाला आहे. राजयोग ध्यानाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, “राजयोग ही आत्मस्मृतीची साधना असून ती व्यक्तीच्या मनाला स्थैर्य, शांती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.”
कोच्चर कुटुंबीयांचा सन्मानपूर्वक सहभाग, नीरज कोच्चर (अध्यक्ष) आणि राकेश चौहान (व्यवस्थापकीय संचालक) यांचे प्रोत्साहन यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. संस्कृती, समुदायभावना आणि मूल्यांप्रती असलेली त्यांची बांधिलकी प्रकर्षाने जाणवली.
या कार्यक्रमाला पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, खासदार हेमंत सवरा, पालघर विधानसभा आमदार राजेंद्र गावित यांच्यासह बोईसर-पालघर परिसरातील लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगपती, पालक, विद्यार्थी आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
विराज प्रोफाइल्स प्रा. लि. ही स्टेनलेस स्टील लाँग प्रोडक्ट्सची जागतिक स्तरावरील आघाडीची उत्पादक कंपनी असून ९० हून अधिक देशांत सेवा पुरवते. औद्योगिक उत्कृष्टतेसोबतच शिक्षण, संस्कृती आणि सामुदायिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कंपनीची सामाजिक बांधिलकी आहे. ‘इंद्रधनुष्य ऑफ द सोल’चे आयोजन हे जागतिक सौहार्द, सांस्कृतिक संवाद आणि समान मानवी मूल्यांप्रती त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरले असे मत आयोजकांनी व्यक्त केले
मानवी एकात्मतेचा, आध्यात्मिक सौहार्दाचा आणि अंतर्मनातील प्रकाश जागविण्याचा संदेश देणारा हा सांस्कृतिक सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.
