पालघर प्रतिनिधी मिलिंद चुरी
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्र येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या भगेरिया इंडस्ट्रीज लिमिटेड (प्लॉट क्र. डी-१७) या कारखान्यात मंगळवारी दुपारी सुमारास दोन वाजण्याच्या सुमारास ओलियम वायू गळतीची घटना घडली. गळतीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही कामगारांना श्वसनास त्रास व चक्कर येण्याची लक्षणे जाणवली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर कारखान्यातील अनेक कामगारांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात सुरुवातीला विलंब झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटना घडल्यानंतर दीड ते दोन तासांनंतर कामगार बाहेर येताना दिसून आले. या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून शासनाकडून काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला असून ते स्वतः घटनास्थळी थांबून सर्व यंत्रणांशी समन्वय साधून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत होते. जिल्हा प्रशासन अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, पालघर पोलीस दलाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते. एनडीआरएफचे पथकही मदतकार्यात सहभागी झाले आहे.
पोलीस अधीक्षक व जिल्हा प्रशासन याच्या मार्गदर्शनाखाली बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह कारखान्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी स्वतःघटनास्थळी जाऊन कामगारांना सुरक्षित बाहेर काढले. खबरदारीचा उपाय म्हणून आसपासच्या कारखान्यांतील कामगारांना तात्पुरते बाहेर काढण्याचे आदेश देण्यात आले.
प्राथमिक तपासात वॉल लिकेजमुळे वायू गळती झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तांत्रिक पथक गळती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे पर्यन्त सुरु आहेत. प्रभावित कामगारांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे .
परिसरातील गावांतील नागरिकांना घरातच राहण्याचे व अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी केले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात वारंवार आग व वायूगळतीच्या घटना घडत असल्याने जवळील गावांसाठी हा वाढता धोका असल्याची भावना व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत प्रशासन सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
