
सुळेंचा पटलेंना फोन अन्.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा सातत्यानं रंगत आहे. मात्र, ते कृतीत उतरताना कुठेही दिसत नाही. यातच शरद पवार यांच्या राट्रवादीचे खासदार फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रयत्न करताना दिसत असल्याचं सांगितलं जात आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील सात खासदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार निवडून आले होते. तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फक्त 1 खासदार तेही सुनील तटकरेंच्या निमित्तानं निवडून आला होता. यातच सुप्रिया सुळे वगळता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 7 खासदारांच्या वैयक्तिक भेटी घेऊन सुनील तटकरे यांनी साधला. ‘तुम्ही सत्तेसोबत या. तसेच, या भेटीची किंवा ऑफरची माहिती बाहेर कुणाला देऊ नका,’ असं तटकरेंनी खासदारांना सांगितल्याचं बोललं जातं.
मात्र, सातही खासदारांनी याची माहिती पक्षातील नेत्यांना आणि सुप्रिया सुळे यांना दिली. तटकरेंच्या या कृतीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते, प्रफुल्ल पटेल यांना फोन करून तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘पुन्हा आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न का करत आहात?’ असा संतप्त सवाल सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना विचारल्याचं सांगितलं जात आहे.
परंतु, सातही खासदारांनी सुनील तटकरेंची ऑफर धुडकावली आहे. दिल्लीतील केंद्र सरकार स्थिर करण्यासाठी सातही खासदारांना फोडण्याचा प्रयत्न होत आहे.
सत्ता आल्यास ती भोगायची असते…
याबद्दल खासदार निलेश लंके म्हणाले, “अशी कुठलीही ऑफर आली नाही. राजकारणात कुठलीही गोष्ट आल्यानंतर सामोरे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. लगेच निर्णय बदलण्याचा विचार करायचा नसतो. सत्ता आल्यास ती भोगायची असते. सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असते.
खासदार आणि आमदार संपर्कात…
आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं, “याबात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच माहिती देतील. दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल, तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली केली. काही खासदार आणि आमदार सुरूवातीपासून आमच्या संपर्कात आहेत. जर कोणी येणार असतील, तर स्वागत आहे. त्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील.