
पोलिसांनी कराडविरोधात 302 नुसार गुन्हा दाखल करावा मी…
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींना अटक करण्यात आली. तर, एक आरोपी फरार आहे. त्याशिवाय, प्रकरणाशी संबंधित असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे.
वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जातात. आमदार सुरेश धस यांच्याकडून या प्रकरणी सातत्याने वाल्मिक कराडवर आरोप होत असताना दुसरीकडे आता शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गृहविभाग आणि पोलिसांना ओपन चॅलेंज दिले आहे.
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. वाल्मिक कराडवर सुरेश धस करत असलेले आरोप सत्य असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. पोलिसांनी वाल्मिक कराडवर 302 नुसार, हत्येचा गुन्हा दाखल करावा, मी स्वत: 50 पीडित कुटुंब पोलिसांकडे घेऊन जाईल असे आव्हाड यांनी सांगितले. वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. बीड जिल्ह्यातील मागील 10 वर्षात झालेल्या हत्यांमध्ये 80 टक्के प्रकरणात कराडच सूत्रधार असल्याचा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
वाल्मिक कराड हा भस्मासूर…
जितेंद्र आव्हाड यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी वाल्मिक कराडला भस्मासूर म्हटले असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. या भस्मासूराचा मीच बंदोबस्त करणार असे त्यांनी म्हटले होते. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे अकाली निधन झाले असल्याचे आव्हाड यांनी म्हटले. वाल्मिक कराडचे पोलिसांसोबत लागेबंध होते, त्यामुळेच त्याच्या विरोधात गुन्हा दाखल होत नसे असा आरोपही आव्हाड यांनी केला.
धनंजय मुंडेंचा राजीनामा का नाही?
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं असे आव्हाड यांनी म्हटले. मुंडे यांचा राजीनामा न घेणे ही कोणती राजकीय अपरिहार्यता आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.