
Oplus_131072
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पुणे/पिंपरी
बद्रीनारायण घुगे
तिघे जण जखमी; तासभर वाहतूक कोंडी.
पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात कंटेनर आणि दोन इको वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असुन एका वृद्ध महिलेचे हाड मोडले आहे. अपघातातील इको वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी (दि ८) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात घडला.
मंचर बाजूकडून राजगुरुनगरकडे जाणाऱ्या उतारावर एकाच लेनमधून ही वाहने मागे-पुढे येत होती. अखेरच्या वळणाच्या उतारावर एक इको वेगात दुसऱ्या इको वाहनावर आदळली. ती इको वेगात असलेल्या लगतच्या कंटेनरला धडकली. अवजड कंटेनर वेगात असल्याने दोन्ही इको वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. इकोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मार लागला. दोघांना गंभीर जखमा झाल्याने तसेच एक वृद्ध महिलेला रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी राजगुरुनगर येथे नेण्यात आले.
या दरम्यान या मार्गावर नाशिक बाजूने येणारी वाहने थांबून राहिली. वाहन पुढे नेण्याच्या प्रकारामुळे अखंड घाटात वाहतूक कोंडी झाली. महामार्ग वाहतूक पोलीसांनी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली. त्यानंतर जवळपास एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.