
दिल्लीची निवडणूक कोण जिंकणार? हे स्पष्टच सांगितले
आगामी काळात होत असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांनी दिल्लीत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’च्या विजयाचे भाकीत केले आहे.
दिल्लीत विधानसभेची निवडणूक माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जिंकतील. मात्र, काँग्रेस या ठिकाणी रिंगणात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले, ‘दिल्लीची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. मला वाटते कदाचित तिथे केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे, काँग्रेसही निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आणि आपमध्ये युती झाली असती तर बरे झाले असते, पण कदाचित तसे होताना दिसत नाही. दिल्लीत काय चालले आहे. ते महाराष्ट्रात बसून सांगणे कठीण आहे.’
महाराष्ट्रात तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. कराड दक्षिणमधून ते निवडणूक रिंगणात उतरले होते. या जागेवरून भाजपचे (BJP) उमेदवार विजयी झाले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला होता.
दिल्लीत निवडणुकीचा पारा शिगेला पोहोचला असताना महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्लीत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर सातत्याने टीका करीत आहे. केजरीवाल नवी दिल्लीतून निवडणूक लढवत आहेत. येथून काँग्रेसने दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, या जागेवर काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित हे विजयाचा दावा करत आहेत. त्याचवेळी भाजपने या जागेवरून माजी खासदार प्रवेश वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेल्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.