
पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या, केली ‘ही’ मागणी
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण गाजत आहे. या घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्याप संतोष देशमुख यांचे सगळे मारेकरी पकडले गेले नाहीत.
या प्रकरणातील एक मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजून फरार आहे. पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. मात्र अजूनही या घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे, हे समोर आलं नाही. मारेकऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी भाजप आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.
राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहेत. आजही पैठण येथे मोर्चा काढला जात आहे. या मोर्चा आणि सभांमधून आरोप प्रत्यारोप केला जात आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचाही आरोप केला जातोय. त्यांच्या अटकेची आणि राजीनाम्याची मागणी आंदोलकांकडून केली जातेय. अशात बीडच्या पाटोद्यात धनंजय मुंडे यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.
धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी पाटोदा पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलनं करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. गोपीनाथ मुंडे साहेब अमर रहे, अशा घोषणा समर्थकांनी दिल्या आहेत. एवढंच नव्हे तर आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. यावेळी पाटोदा पोलीस ठाण्याच्या परिसरात सुरेश धस यांचा गटही उपस्थित होता. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता.
पण सुरेश धस गट बाहेर पडल्यानंतर मुंडे समर्थकांनी पुन्हा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे पाटील, सुरेश धस आणि अंजली दमानिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. जोपर्यंत या तिघांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहणार, असा पवित्रा मुंडे समर्थकांनी घेतला आहे. एकीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, यासाठी विविध संघटनांकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. अशात मुंडे समर्थक आक्रमक झाल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.