
बैठकीत विशेष सूचना, ‘त्रिसूत्री’वर काम करणार
विधानसभा निवडणुकीत झालेल्या मानहानीकारक पराभवाने शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खचलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर खचलेल्या मनांना उभारी देण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून पक्षातील कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे.
मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना पक्षाची ताकद दाखवून देऊ, असा निर्धार नेते-उपनेत्यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांच्या साक्षीने व्यक्त केला.
मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक आदी महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने त्यादृष्टीने तयारी करण्यासाठी आणि संभाव्य समीकरणांची चाचपणी करण्यासाठी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते विनायक राऊत, सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे आदींच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीला राज्यभरातील जिल्हाध्यक्षांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे हजेरी लावली.
कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो ‘त्रिसूत्री’वर काम करा!
शिवसेना पक्षासाठी आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घेऊन कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे. त्यासाठी संपर्क-संबंध आणि संवाद या त्रिसूत्रीवर काम करावे. पराभव झालेला असला तरी आपण जनतेमध्ये जावे. जनतेचे प्रश्न जाणून घेऊन सरकारी दरबारी ते प्रश्न पोहोचतील, यासंबंधीचे प्रयत्न करावे. लोकांना प्रत्यक्ष भेटले पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे, त्यांच्याशी संपर्क आणि संबंध ठेवले पाहिजे जेणेकरून आपला आणि लोकांचा संवाद होईल. त्यातूनच त्यांच्या मनात पक्षाविषयी अनुकूल मत निर्माण होईल, असे मार्गदर्शन नेते उपनेत्यांनी राज्यभरातील पदाधिकऱ्यांना केले.
उद्धव ठाकरे यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्लॅन ठरला
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढच्या दोन ते तीन महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधानसभेचा पराभव विसरून आपल्याला मोठ्या ताकदीने निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरील अहवाल तुम्ही पक्षाकडे सादर करा. आपल्यासाठी कुठे अनुकुल परिस्थिती आहे? कुठल्या जिल्ह्यात कुणासोबत गेल्यावर पक्षाला फायदा होईल? कुठे स्वबळावर लढायचं? कुठे कुणाची युती करायची? यासंबंधीचा अहवाल पक्षाला सादर करा, अशा सूचना जिल्हाध्यक्षांना देण्यात आलेल्या आहेत. एकंदरितच स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून युती-आघाडीचा निर्णय घेण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून देण्यात आले आहेत.
पक्ष डिजीटल करण्यावर भर
शिवसेना पक्ष कात टाकण्याच्या तयारीत आहे. पारंपारिकतेबरोबर डिजीटल माध्यमांचा शक्य होईल तितका उपयोग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे. भाजपच्या सदस्य नोंदणी मोहिमेच्या धर्तीवर शिवसेना शाखांनीही काम करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.