ढसाढसा रडले संजू सॅमसनचे वडील
भारताचा स्टार विकेटकीपर बॅटर संजू सॅमसन सध्या बराच चर्चेत आहे, याचं कारण ठरतंय ते संजू सॅमसनची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची भारतीय टीममध्ये निवड न होणं. एवढच नाही तर संजू सॅमसनला त्याची स्थानिक टीम असलेल्या केरळच्या कॅम्पमध्येही सामील करून घेण्यात आलेलं नाही, त्यामुळे संजू सॅमसनला विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळच्या टीममध्येही निवडण्यात आलेलं नाही.
पण इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठी संजू सॅमसनची निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनला प्लेयिंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधीही मिळाली.
चॅम्पियन्स ट्रॉफी आणि केरळच्या टीममध्ये संजू सॅमसनची निवड न झाल्यामुळे त्याचे वडील सॅमसन विश्वनाथ भावुक झाले. स्पोर्ट्स टुडेसोबत बोलत असताना संजू सॅमसनचे वडील ढसाढसा रडले. माझ्या मुलाविरोधात कट रचला जात आहे, तो केरळ क्रिकेट असोसिएशनमध्ये सुरक्षित नाही, असा आरोप संजू सॅमसनच्या वडिलांनी केला आहे.
10-12 वर्षांपासून अडचणींचा सामना
काहीच दिवसांपूर्वी केरळ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी सॅमसनवर टीका केली होती. कुणी त्यांना वाटेल तेव्हा केरळकडून खेळू शकत नाही असा निशाणा जॉर्ज यांनी संजू सॅमसनवर साधला होता. यानंतर संजूच्या वडिलांनी केरळ क्रिकेट असोसिएशनवर सनसनाटी आरोप केले आहेत. ‘आम्ही केरळ क्रिकेट असोसिएशनच्या विरोधात जाऊन कोणतंही काम केलेलं नाही. आमच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही. मी किंवा माझ्या मुलाने यांच्याविरोधात एक शब्दही काढला नाही. हे फक्त आजचं नाही, मागच्या 10-12 वर्षांपासून आम्ही अडचणींचा सामना करत आहोत’, असं संजूचे वडील म्हणाले.
‘यामागे कारण काय आहे, हे कोण करत आहे? हे आम्हाला माहिती नाही. आम्ही आजही केरळ क्रिकेट असोसिएशनला ब्लेम करत नाही, त्यांनी आमच्या मुलाला पाठिंबाच दिला. संजूचा मोठा भाऊही क्रिकेटर होता, माझ्या दोन्ही मुलांनी केरळसाठी चांगली कामगिरी केली. मोठ्या मुलगाही अंडर-19 मध्ये केरळकडून चांगला खेळला, पण तरीही वनडेमध्ये त्याची निवड झाली नाही. मग त्याची अंडर-25 टीममध्ये निवड झाली. आमच्या मुलाला चार मॅच बाहेर बसवलं, तेव्हापासूनच मला संशय यायला सुरूवात झाली’, असं वक्तव्य संजूच्या वडिलांनी केलं आहे.
मोठ्या मुलाला पाचव्या सामन्यात संधी मिळाली. तो ओपनर नव्हता, तरीही त्याला ओपनिंगला पाठवलं. तरीही त्याने चांगली कामगिरी केली, मॅचदरम्यान त्याला दुखापत झाली, पण यांनी त्याचा उल्लेखही केला नाही. तेव्हापासून या गोष्टी सुरू आहेत. आम्ही काही चूक केली असेल तर तसं सांगा, आम्ही माफी मागतो’, अशी प्रतिक्रिया संजू सॅमसनच्या वडिलांनी दिली आहे.
’11 वर्षांपूर्वी या लोकांनी मला सांगितलं की ही लोक सॅमसनला एकही मॅच बघायला येऊ देणार नाही, त्याला बॅन करण्यात आलं आहे. माझ्या मुलाने काही चूक केली होती, तर मला बोलवायचं होतं, मी लगेच आलो असतो. मला मुलांचं करिअर बनवायचं होतं, मी कुणासोबत का चुकीचं वागू? मी राजा-महाराजांसोबत पंगा का घेऊ? माझ्या मुलाचं करिअर बर्बाद झालं असतं’, असं संजूचे वडील म्हणाले.
माझा मुलगा सुरक्षित नाही
विजय हजारे ट्रॉफीवरून झालेल्या वादावरही संजूचे वडील बोलले आहेत. ‘केरळ क्रिकेट असोसिएशनने अधिकृतरित्या याचं काहीही उत्तर दिलेलं नाही. संजू असाच खेळाडू बनला नाही, त्याने मेहनत केली आहे. संजूने त्याचं पूर्ण आयुष्य मैदानात घालवलं आहे. संजू विरोधात असोसिएशनमध्ये षडयंत्र रचलं जातंय, हे मला दीड महिना आधीच कळालं होतं’, असा आरोप संजूच्या वडिलांनी केला आहे.
‘त्याने सोडून जावं म्हणून त्याच्याविरोधात गोष्टी केल्या गेल्या. आम्ही यांच्याशी पंगा घेऊ शकत नाही. माझा मुलगा इकडे सुरक्षित नाही. ही लोक माझ्या मुलावर काहीही आरोप करतील आणि लोक विश्वासही ठेवतील. माझ्या मुलाने केरळकडून खेळणं सोडून द्यावं, त्याने दुसऱ्या राज्याकडून खेळावं, अशी माझी इच्छा आहे. माझा मुलगा इकडे सुरक्षित नाही. इकडे कोळ्याचं जाळं आहे, माझ्या मुलाला हे लोक बदनाम करतील, अशी भीती आहे’, असं संजूचे वडील म्हणाले आहेत.


