
काय आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट? दमानियांनी मागितली अजित पवारांची वेळ
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपी धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत, तपास यंत्रणेवर त्यामुळे दबाव निर्माण झालेला आहे आणि मुख्य म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची एकत्रित मालमत्ता आणि व्यवसाय आहेत.
त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे, अशी भूमिका अंजली दमानिया यांची आहे.
मागच्या काही दिवसांपासून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सर्वस्तरातून होत असतानाही राजीनामा घेतला जात नाहीये. त्यामुळे अंजली दमानिया ह्या थेट अजित पवार यांची भेट घेणार आहेत. त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे.
अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीडचे जे कृत्य हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना?
दमानिया पुढे म्हणाल्या, मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत? कसे व्यवहार एकत्र आहेत? धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे महाजनकोशी कसे व्यवहार करत आहेत? हे पुरावे दाखवण्यासाठी मी अजित पवारांकडे वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकीसुद्धा रद्द झाली पाहिजे, बघू ते कधी वेळ देतात.
काय आहे ऑफिस ऑफ प्रॉफिट?
स्वतः आमदार किंवा खासदार असताना कुठल्याही यंत्रणेकडून स्वतःला किंवा परिवाराला कुठल्याही आर्थिक लाभ घेता येत नाही. परंतु धनंजय मुंडे यांची व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिस नावाची एक कंपनी आहे. त्यात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड आणि आणि राजश्री मुंडे आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या रुलिंगनुसार एक रुपया जरी फायदा झाला तर तो प्रकार ऑफिस ऑफ प्रॉफिट असतो. या मुद्यावरुन मुंडे यांचं मंत्रिपदच काय आमदारकीसुद्धा रद्द होऊ शकते, असं दमानिया म्हणतात.
राजश्री मुंडेंच्या आई शेअर होल्डर
अंजली दमानिया म्हणतात, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियलमध्ये राजश्री मुंडे अद्यापही डायरेक्टर आहेत. एवढंच नव्हे तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांच्या आईदेखील टॉप मोस्ट शेअर होल्डर आहेत. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात. या कंपनीमध्ये आजपर्यंत केवळ धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, वाल्मिक कराड यांचं नाव पुढे आलेलं होतं.