
आर्थिक अडचणीमुळे संपवलं जीवन?
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय निर्माता के पी चौधरी यांनी गोवा येथे आत्महत्या केली आहे. गेल्या काही काळापासून ते आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं बोललं जात आहे. इतकंच नाही, तर ते नैराश्यामुळे त्रस्त झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, निर्माता आधीपासूनच आर्थिक समस्यांनी ग्रासलेला होता. याशिवाय,ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात गेल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली होती.
के पी चौधरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माते असून त्यांनी मेगास्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्यांना हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती. टॉलीवुड आणि कॉलीवुडमध्ये ड्रग्जचा धंदा करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यांच्यावर कर्ज खूप होते. कर्ज फेडण्याचा त्यांच्यावर दबाव होता. अशातच, कोरोना काळात सगळं ठप्प झाल्यानंतर ते ड्रग्जच्या धंद्यात गुंतले. यातील कमाईतून ते त्यांचा उदर्निर्वाह करत होते.
के पी चौधरी यांनी गोवा येथे ‘OHM’ नावाचा एक पब सुरू केला होता. येथे ते ग्राहकांसोबत ड्रग्जचा व्यवहार करत असे आणि प्रसिद्ध सेलिब्रिटींना ड्रग्जचा पुरवठाही करत असे. के पी चौधरी निर्मित ‘कबाली’ हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. यामध्ये साऊथचा सुपरस्टार रजनीकांत मुख्य भूमिकेत होते. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचे बजेट जवळपास १०० कोटी रुपये होते. तर,’सकनिल्क’च्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. ‘कबाली’ हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला होता. रजनीकांत आणि राधिका आपटे या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत होत्या.