त्यांचे पाप झाकले जाणार नाही, नामदेवशास्त्रींनाही सुनावले
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप केले असतानाच मनोज जरांगे पाटील यांनीही मुंडेंवर निशाणा साधला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरीब लोकांचे दारिद्रय दूर करण्यासाठी जीवाचे रान केले अन् धनजंय मुंडे यांनी संपूर्ण समाज मातीत मिसळवला.
पैशासाठी जातीवाद केला अन् स्वत:ला संपवून घेतले. पण आता त्यांची पापे झाकली जाणार नाहीत अशी टीका केली आहे. मनोज जरांगे यांनी भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्रींवरही हल्लाबोल केला आहे.
अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर 275 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत, यावर बोलताना जरांगे म्हणाले की, गोरगरीब, कष्टकरी शेतकऱ्यांचे पैसे खाणे धक्कादायक आहे, त्यांचे रक्त पिऊ नका. हे सगळे लोक सारखे आहेत. गोरगरीब लोकांच्या जमीन हडपणे, हार्वेस्टरचे अनुदान हडपणे, असे उद्योग यांनी केले आहेत. हे सगळे लोक सारखे आहेत त्यांचे त्यांच्याच लोकांवरती प्रेम आहे, बाकीच्या जनतेवर प्रेम नाही. गोपीनाथ मुंडे यांनी गोरगरीब लोकांचे दारिद्रय दूर करण्यासाठी जीवाचे रान केले अन् धनजंय मुंडे यांनी संपूर्ण समाज मातीत मिसळवला. पैशासाठी जातीवाद केला अन् स्वत:ला संपवून घेतले. थोडी राहिली आहे ती तरी सांभाळून ठेवा.
मनोज जरांगे म्हणाले की, सरकार अशा लोकांना सांभाळत आहे त्यामुळे जनतेलाच आता राज्यात रस्त्यावर उतरावे लागणार आहे. धनंजय मुंडेंनी विम्याचेही पैसे खाल्ले असतील, अधिकृत माहिती नसली तरी त्यांनी परळीत शेततळ्याची, रोजगार हमीची, घरकुले, सरकारीच योजनांमधील विहिरींची कामे न करताच पैसे उचलल्याची चर्चा आहे. पण आता कोणीही त्यांना जवळ करणार नाही, त्यांच पाप झाकणार नाही. त्यांच्या जातीमधील देखील कोणी त्यांचे समर्थन करणार नाही.
नामदेवशास्त्रींनाही सुनावले
भगवान गडाने पाठिंबा काढून घेतला आहे यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, त्यांनी पाठिंबा काढावा किंवा ठेवावा याच्याशी आम्हाला देणंघेणं नाही. जे चित्र दिसायचे होते ते राज्यासमोर दिसलेले आहे. नामदेवशास्त्री बोलायचे आहे ते बोलून गेले आहेत. त्यामुळे आता कितीही सारवासारव करुन उपयोग नाही. तुम्हाला जे सिद्ध करायचे होते ते तुम्ही सिद्ध केले. तुमचा चुकीचा जरी असला तो बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेल आहे, असे जरांगे म्हणाले.
तुमचं लेकरु कितीही वाईट असलं कितीही बलात्कार, छेडछाडी, खून करत असेल तरीही ते तुमच्यासाठी चांगले आहे, पण दुसऱ्याच्या लेकराचा मृत्यू झाला यांचं त्यांना दु: ख नाही उलट आनंद आहे. तुम्ही पाठिंबा द्या अथवा न द्या, दुसरी बाजू भक्कम आहे, असे मनोज जरांगे यांनी सुनावले.
