
पंचांची सर्वात मोठी चूक सांगितली!
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने मानाची गदा पटकावली आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून आयोजित केलेल्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेने पंचांना केलेल्या मारहाणीवरून मोठा वाद उद्भवला आहे. पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakse) याने पंचांना लाथ मारली अन् कॉलर देखील धरली. त्यानंतर मॅटवर मोठा राडा झाल्याचं दिसून आलं होतं. अशातच हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. अशातच प्रसिद्ध मल्ल सिकंदर शेख याने या प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे.
शिवराज राक्षेला शिवीगाळ झाली म्हणून – सिकंदर शेख
शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली त्यावर सिकंदर शेखने प्रतिक्रिया दिली. समोरून काही प्रतिक्रिया आल्याशिवाय असा प्रकार घडू शकत नाही. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड किंवा मी असो समोरच्याने चूक केली असावी. त्याला शिवीगाळ झाली म्हणून त्याला राग कंट्रोल करता आला नाही, असं सिकंदर शेखने म्हटलं आहे. पंचांना मारहाण करण्याची पैलवानकीची शिकवण नाही. पण पैलवानही असं करू शकत नाहीत, असं सिकंदरने म्हटलं आहे. समोरून काहीतरी अनुचित शिवीगाळ झाल्यानं शिवराज राक्षेने लाथ मारली, त्याला राग कंट्रोल झाला नाही, असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.
मारहाण करायला नव्हती पाहिजे – सिकंदर शेख
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड एका तालमीतील पैलवान आहेत. फायनल सामन्यावेळी महेंद्र गायकवाड लढत का सोडून गेला माहित नाही. पण महेंद्र गायकवाड भरपूर तणावात आला असावा, त्याला कुस्ती कशी खेळायची हेसुद्धा विसरून गेला. यात शिवराज राक्षेची काही चूक नाही, पण त्यानेही मारहाण करायला नव्हती पाहिजे, असं मत देखील सिकंदर शेखने मांडलं आहे. जर्सी फाटल्यावर महेंद्र गायकवाडला एक गुण द्यायला हवा होता. तरीही त्याला गुण दिला गेला नाही, असं म्हणत सिकंदर शेखने पंचांची सर्वात मोठी चूक दाखवून दिली.
महाराष्ट्र केसरीचा बाजार – सिकंदर शेख
दरम्यान, सध्या नवीन कुस्तीपटू येत आहेत. परंतू महाराष्ट्र केसरीचा बाजार करुन टाकलाय. नवीन खेळाडूंचं खच्चीकरण होतंय. कारण वर जाऊन राजकारण होत असल्याने मल्लांन महाराष्ट्र केसरी खेळण्याचं मन होत नाहीये, असं मत देखील सिकंदर शेखने मांडलं आहे.
माझ्या तालमीतील पैलवानावर अन्याय – काका पवार
हिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माझ्या तालमीतील पैलवानावर अन्याय झाला आहे. शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर झालेली 3 वर्षे बंदीची कारवाईच चुकीची असल्याचं वस्ताद काका पवार यांनी म्हटलं आहे. नगरमध्ये पैलवानावर पोलिसांनी लाठीचार्ज का केला? त्याचा मी निषेध करतो, आमची पोरं काय तिथं खून करायला आलती का? असा सवाल देखील काका पवार यांनी यावेळी विचारला.