
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण, वाल्मिक कराड खंडणी प्रकरण, विविध हत्या आणि मारहाणीच्या वृत्तांमुळे बीड जिल्हा धगधगतो आहे
बीडचा बिहार झाल्याचा (Beed Crime) दावा केला जात आहे. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीबद्दल सत्ताधारी नेत्यांसह विरोधकांकडून टीका केली जात असताना मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.
मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा असताना धनंजय मुंडे मात्र सुट्टीवर असल्याचं समोर आलं आहे. स्वत: धनंजय मुंडेंनी याबाबत ट्विट करून माहिती दिली. धनंजय मुंडे यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे पुढील चार ते पाच दिवस भेटता येणार नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीसांची भेट टाळण्यासाठी हा प्रकार घडल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मंगळवारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडेंवर कृषी घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत पुरावेही सादर केले. पुन्हा एकदा दमानिया यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात शिंपोरा ते खुंटेफळ योजनेतील बोगद्याच्या कामाचे आणि श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन होणार आहे. मात्र धनंजय मुंडे शस्त्रक्रियेमुळे या कार्यक्रमापासून दूर राहिले आहेत.