
शरद पवार-ठाकरे गटांत जुंपली…
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते झालेला सत्कार आणि शिंदे यांच्यावर पवारांनी उधळलेली स्तुतीसुमने यामुळे महाविकास आघाडीत नवी आग लागली आहे.
दिल्लीत मंगळवारी झालेल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना सरहद संस्थेचा महादजी शिंदे राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तशी कोणतीही प्रतिक्रिया ठाकरे गटाने दिलेली नव्हती. मात्र, हा पुरस्कार दिल्यानंतर शरद पवारांनी केलेल्या भाषणाने ठाकरे गटात संतापाचा आगडोंब उसळला. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत रोज सकाळी त्यांच्या विरोधकांवर तिरंदाजी करत असतात. ज्या पवारांचे कट्टर समर्थक म्हणून राऊत ओळखले जातात त्याच पवारांकडे बुधवारी राऊतांचे शरसंधान सुरू झाले आणि महाविकास आघाडीला फुटीचे नवे हादरे बसले.
राऊतांचे शरसंधान पवारांवर
राऊत म्हणाले, हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार नाही तर शरद पवारांनी जणू अमित शहा यांचा सत्कार केला आहे, असे आम्ही मानतो. हा महाराष्ट्र तोडणाऱ्या शहांचा सत्कार आहे. आम्हाला तुमचे दिल्लीतील राजकारण काय आहे हे माहीत नाही. मात्र, आम्हालाही दिल्लीतील राजकारण समजते. ज्यांनी महाराष्ट्र कमजोर केला अशा लोकांना आपण सन्मानित केले. यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या असतील. महाराष्ट्रातल्या जनतेला हे पटलेले नाही, असे राऊत म्हणाले.
राऊतांचे संतुलन बिघडले : शिंदे गट
राऊत यांच्या पवारांवरील टीकेचा एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. टीका करणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली आहे. लोकांनी त्यांना चारीमुंड्या चित केले आहे. त्यामुळे त्यांचे संतुलन बिघडले आहे. त्यांना द्वेषाने एवढे पछाडले आहे.
पवार काय म्हणाले?
शिंदेंनी सर्वांना सोबत घेत राज्याचा विकास केला. राजकीय दुरावा कमी केला. मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या विकासाला गती दिली, अशा शब्दांत शरद पवारांनी शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले आणि आधीच दभंगलेल्या महाविकास आघाडीत हेच कौतुक भांडणाचे नवे कारण बनले.