
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर परीक्षा विभागाच्या प्रभारी पदाची जबाबदारी कोणाकडे देणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते.
अखेर बुधवारी (दि.12) दुपारी परीक्षा व मूल्यमापन विभागाची धुरा अंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता व मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी डॉ. देसाई यांच्याकडे परीक्षा विभागाच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सोपवली आहे. डॉ. देसाई यांनी पदभार स्वीकारला. या वेळी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. नितीन घोरपडे, आयक्यूएसी सेंटरचे संचालक डॉ. विनायक जोशी यांच्यासह परीक्षा विभागाचे सर्व उपकुलसचिव व इतर अधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणार्या महाविद्यालयांमध्ये सुमारे साडेसात लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करणे, उत्तरपत्रिका तपासणी व वेळेत निकाल जाहीर करणे, ही तारेवरची कसरत आहे. त्यातच गुरुवारी परीक्षा विभागातील प्रलंबित प्रश्नांसह इतर काही प्रश्नांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला दुसर्या दिवशीच डॉ. देसाई यांना सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.