
मुंबई पुण्याला जोडणार 180 मीटर उंच केबल-स्टेड पूल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक हा महाराष्ट्रातील सर्वात लक्षवेधी आणि महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पहिला हवेत तरंगणारा महामार्ग बांधला जात आहे.
हा प्रकल्प म्हणजे अभियंत्रीकी चमत्कार मानला जात आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत मुंबई पुण्याला जोडण्यासाठी 180 मीटर उंच केबल-स्टेड पुल उभारला जात आहे. यामुळे मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही. सध्या या प्रकल्पाच्या काम वायु गतीने सुरु आहे. कारण, पावसाळा सुरु होण्याआधी या प्रकल्पातीलस अत्यंत महत्वाच्या टप्प्याचे काम पूर्ण करायचे आहे. कारण हा टप्पा अतिशय आव्हानात्मक आहे. पावसाळ्यात हे काम करणे जवळपास अशक्य आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक मुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीनं कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे प्रवाशांची लोणावळा घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. डिसेंबरपर्यंत हा प्रलल्प पूर्ण करण्याचं एमएसआरडीसीचे टार्गेट होते. मात्र, निश्चित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकलेला नाही. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील महत्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येत आहेत. खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे हे 2 बोगदे आहेत. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामं पूर्ण झाले आहे.
सह्याद्रीच्या डोंगरात अतिशय दुर्गम अशा भागात केबल स्टेड पुल उभारणे हे इंजीनीयर्ससाठी मोठे आव्हान असणार आहे. 2024 मध्ये खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा पावसाळा सुरु होण्याआधी हा आव्हानात्मक टप्पा पूर्ण करायचा आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. ऑगस्ट 2025 पर्यंत याचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिसींग लिंकमुळे मुंबई पुणे या शहरातील अंतर 6 किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे.