
महायुतीत वाद नाही…
महिना उलटूनही नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. यातच महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेससह शिवसेनेनेही या पदावर दावा ठोकला असल्याने महायुतीत पेच निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच पालकमंत्रिपदावर भाष्य केले आहे. पालकमंत्रिपदाबाबत कुठलाही वाद नाही, पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटला जाईल. यामुळे जनतेचे कुठलेही काम थांबणार नसल्याचे उपणुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे शुक्रवारी (दि.14) त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) दौऱ्यावर होते. त्यावेळी मंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पालकमंत्रिपदाबाबत महायुतीत कोणताही वाद नसून हा तिढा लवकरच सोडविला जाईल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्र्यांनी अगोदर बैठक घेतली आहे. या बैठकीला मंत्री गिरीश महाजनही उपस्थित होते. बैठकीत आम्ही त्यांना आता थांबायचं नाही, अशा सूचना दिल्या आहेत.
नाशिकला कुंभमेळा हे आपले भाग्य आहे. महायुतीला दिलेल्या भरघोस मतांमुळे नाशिककरांचे आभार माणण्यासाठी आलो असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयातील वाॅर रूमबाबत विचारले असता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्यात कुठलाही वाॅर नाही. तुम्हीच गफलत करत आहात. मोठे प्रकल्प सीएम वाॅररूममध्ये घेतले जातात. त्याच्या प्रगतीचा आढावा घेतला जात आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी समन्वय कक्ष तयार केला आहे तो वाॅररूम नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही समन्वय कक्ष तयार केला आहे. त्यांच्याकडील मंत्र्यांकडे असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा कक्ष असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मंत्री धनंजय मुंडेंच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बोलण्याचे टाळले.